7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. 7 एप्रिल 1948 मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ 192 देशांचा सहभाग होता. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच मर्यादित न रहाता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला आरोग्याकडे लक्ष देणे अतिमहत्त्वाचे झाले आहे. ध्यान, धारणा, योगासन, प्राणायाम, व्यायाम याकडे पहाण्यासाठी त्यांना मुळी वेळच नाही. सध्या लोकांना शिस्त नकोय. घरचे चवीष्ट पदार्थ आवडत नाहीत. बाहेरील तेलकट पदार्थ खाण्यास त्यांची जीभ चटावलीय. हसत खेळत जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे.
आपल्याला जमेल तसा म्हणजे पहाटे, सकाळी उठल्यावर व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे. आपण आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी किंबहुना त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणार्या आपल्या शरीराची घेत नाही असे म्हणावेसे वाटते.
दिर्घायुष्य लाभावं, आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत, या करीता आपला आहार, आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.
मानवाने व्यायामात नियमितता व सातत्य ठेवावे. या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा. ताणतणाव विरहित जीवन जगा. ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच तनावमुक्त राहू शकाल...
जागतिक आरोग्य दिनानिमित्त आजपासून सर्वांनी व्यायाम सुरू करून त्यात सातत्य ठेवावे. कोरोना सारख्या आलेल्या व येणार्या संकटांवर मात करण्यासाठी उत्तम आरोग्य सर्वांना लाभावे हीच सदिच्छा!