बेकायदेशीर डिजिटल बोर्ड लावणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

0
19 जणांना बजावल्या नोटीसा

पंढरपूर (प्रतिनिधी) - शहरात
बेकायदेशीर डिजिटल बोर्ड लावून सार्वजनिक जागांचे विद्रुपीकरण आणि  वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे जाहिरात व्यावसायिक, व्यापारी आणि डिजिटल प्रिंटिंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय पंढरपूर नगरपरिषदेने घेतला आहे. या विषयाच्या अनुषंगाने 19 जणांना कायदेशीर नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.
मा.उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडील पीआयएल क्र. 155/2011 मधील आदेशानुसार महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1995 तरतुदीनुसार पंढरपूर शहरात विना परवाना डिजिटल बोर्ड, होर्डिंग्ज, बॅनर्स लावणे गुन्हा आहे. 
अनेकवेळा सूचना देवून देखील शहराच्या विविध भागात रस्त्याच्या कडेला, रस्ता दुभाजक आदी ठिकाणी वासे बांबू उभारुन राजकीय व व्यावसायिक बोर्ड लावले जात आहेत.
या बेकायदेशीर डिजिटल बोर्डमुळे शहराच्या सौंदर्यात बाधा पोहचून शहर विद्रूप होत आहे. या विषयाच्या अनुषंगाने अनिकेत मेटकरी, आकाश पवार, अनिल लोखंडे, वैभव साळुंखे, दोस्ती डिजिटल, न्यू दोस्ती डिजिटल, दर्लीग ग्राफिक्स, जव्हेरी डिजिटल, कलासिद्धी डिजिटल आदी संबधित असणाऱ्या 19 व्यावसायिकांना बेकायदेशीर जाहिरात व प्रिंटिंगचे काम थांबविण्याच्या नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.
 त्याच बरोबर बेकायदेशीर व्यावसायिकांना जाहिरात देणाऱ्या राजकीय व्यक्ती अन् व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला असून बेकायदेशीर जाहिरात करणाऱ्या व्यापाऱ्यावर व संस्थांवर दंडात्मक कारवाई करुन गुन्हे दाखल केले जाणार आहेत. शहरातील व्यापाऱ्यांना दंडात्मक कारवाईच्या नोटीसा यापूर्वीच बजाविण्यात आल्या आहेत.
तेंव्हा संबधित राजकीय, सामाजिक व्यक्तींनी व व्यापाऱ्यांनी आपले डिजिटल बोर्ड त्वरित काढून घ्यावेत तसेच सार्वजनिक मालकीच्या भिंतीवर ज्यांनी जाहिराती रंगविल्या आहेत त्यांनी  जैसे थे करुन द्याव्यात अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास ते स्वतः जबाबदार राहतील असे नगरपरिषदेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)