पंढरपूर– ‘राज्यातील तंत्रशिक्षणात अव्वल ठरत असलेल्या स्वेरीतील विविध संशोधनामुळे येथील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळत असून भविष्यात होणाऱ्या सर्वांगीण प्रगतीचे हे लक्षण आहे.’ असे प्रतिपादन मुंबईमधील राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन (आर.जी.एस.टी. सी.) चे सदस्य सचिव डॉ.नरेंद्र शहा यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आर.जी.एस.टी.सी.चे सदस्य सचिव व इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी, मुंबई मधील सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्हज फॉर रूरल एरियाज (सितारा) चे सेवानिवृत्त प्रा. डॉ. नरेंद्र शहा यांनी भेट दिली. यावेळी स्वेरीतील विविध विभागांच्या भेटी दरम्यान स्वेरीची संशोधनातील गरुडझेप पाहून ते भारावून गेले. प्रारंभी शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांनी त्यांचे स्वागत केले. संशोधन विभागातील विविध शोध कार्याची सचिव डॉ.शहा यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. याचवेळी त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या संशोधनासंबंधी असलेल्या विविध प्रस्तावांची सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉ.शहा यांनी स्वेरीच्या ऍडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग लॅबोरेटरीची पाहणी केली व तेथील अत्याधुनिक साधनांची माहिती जाणून घेतली. यावेळी डॉ.पवार यांनी स्वेरीला संशोधनासाठी मिळालेला निधी व संशोधनातील प्रगती याबद्धल लेखाजोखा सादर केला.
स्वेरीमध्ये होत असलेल्या संशोधनाचा उंचावत जाणारा आलेख पाहून डॉ. शहा यांनी स्वेरीचे कौतुक केले. ‘स्वेरीत होणाऱ्या संशोधनातील सातत्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती वाढीस लागली असून भविष्याच्या दृष्टीने हे मोलाचे आहे.’ असे मत ही डॉ. नरेंद्र शहा यांनी व्यक्त केले. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व संशोधन अधिष्ठाता डॉ.आर. आर.गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संशोधन भेटीमध्ये डॉ. शहा यांनी स्वेरीतील अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापकांना संशोधनाविषयी महत्त्वाची माहिती दिली. यावेळी स्वेरीच्या संशोधक प्राध्यापकांनी संशोधनासंबंधी अनेक प्रश्न विचारले असता डॉ.शहा यांनी त्यांची समाधानकारक उत्तरे दिली. डॉ.शहा यांच्या भेटीमुळे स्वेरीमधील संशोधनाला आणखी गती मिळणार हे मात्र नक्की!