पंढरपूर दि. 29 (प्रतिनिधी) - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल झालेल्या मतदानानंतर आज शासकीय गोडाऊन येथे मतमोजणी झाली. या निवडणुकीत १८ पैकी ५ जागांवर परिचारक समर्थक उमेदवार बिनविरोध विजयी झाले. तर उरलेल्या 13 जागांसाठी काल विविध मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्याची मतमोजणी आज पूर्ण होऊन सर्व जागांवर परिचारक गटाने आपले वर्चस्व अबाधित राखले.
विठ्ठल परिवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांनी प्रथमच 13 जागांवर आपले उमेदवार उभे करीत परिचारक गटाला आव्हान दिले होते. यात पांडुरंग परिवार प्रणित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक शेतकरी विकास आघाडीस घवघवीत यश मिळाले आहे. हे यश प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली मिळाले असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
गेली 25 वर्षे बाजार समितीवर परिचारक गटाचे वर्चस्व होते. ते त्यांनी आत्ताही अबाधित राखले आहे. या विजयामुळे परिचारक समर्थकात गुलालाची उधळण होत असून हलगीच्या तालावर जल्लोष होताना दिसत आहे.