मंगळवेढा (प्रतिनिधी) :- गेल्या दोन वर्षांपासून मंगळवेढा तालुक्यातील बंद असलेली भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना येत्या तीन ते चार दिवसांमध्ये सुरू होणार असल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. सदर योजना सुरू होण्याच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक अडचणी दूर झाली असून ही योजना सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले आहे.
सदर योजना सुरू करण्यासंदर्भात आमदार समाधान आवताडे यांनी महावितरण, एमजेपी, ग्रामीण पाणीपुरवठा या खात्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन योजना चालू करण्यासंदर्भात आवश्यक पाऊले उचलून लवकरात - लवकर ही योजना सुरु करण्यासाठी सूचित केले होते. आ. आवताडे यांच्या नेतृत्वामधील या कार्यतत्परतेमुळे भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये सुरु करण्याच्या हालचाली आता गतिमान झाल्याची दिसून येत आहे. तसेच सदर योजना सुरू करण्यासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता करण्यासाठी आमदार अवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु ठेवला होता.
मंगळवेढा तालुक्यातील भोसे गावासह ३९ गावांना ७१कोटी रुपयांची योजना मंजूर झाली परंतु ही योजना गेल्या दोन वर्षापासून महावितरण कंपनीची एक कोटी १७ लाखाची थकबाकी तसेच पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी थकित असल्याने योजना बंद आहे त्यामुळे या भागातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये व ही योजना तातडीने सुरू व्हावी यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी महावितरण, एमजेपी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन योजना चालू करण्याच्या दृष्टीने आढावा घेतला होता. या बैठकीच्या वेळी किती गावांना पाणी मिळते, किती गावांना मिळत नाही, योजनेचे थकीत बिल, काही कामे अपूर्ण राहिले आहेत काय, नागरिकांना त्या त्या गावात उच्च दाबाने पाणी मिळते काय, मिळत नसल्यास पर्यायी उपाय योजना काय, योजना पूर्ववत चालू ठेवण्यासाठी दुरुस्ती खर्च किती येईल, दुरुस्तीचा कालावधी किती लागेल याबाबत सविस्तर चर्चा झाली होती.
तसेच थकित वीज बिल व थकीत पाणीपट्टी साठी लागणारी रक्कम टंचाई निधी, पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून मिळणारा निधी, जिल्हा नियोजन मधून मिळणारा निधी याची देखील चर्चा यावेळी झाली होती. तसेच तातडीने दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चाचे इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी आमदार आवताडे यांनी येणाऱ्या उन्हाळ्यातील पाणीटंचाई ची तीव्रता पाहता ही योजना तातडीने चालू करून या भागातील नागरिकांना स्वच्छ व चांगले पाणी मिळावे यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहून या योजनेच्या माध्यमातून पाणीटंचाई दूर करावी अशा सूचना देखील दिल्या होत्या.ही योजना पूर्ववत चालू ठेवण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद होण्यासाठी सरकारकडे आपला पाठपुरावा राहील असेही त्यांनी त्या बैठकीवेळी सांगितले होते.
आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या या प्रयत्नांच्या माध्यमातून सदर भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना येत्या तीन ते चार दिवसांमध्ये चालू होणार असल्याने या भागाच्या लाभार्थी गावातील ग्रामपंचायत संस्थांनी आपल्याकडील थकबाकी अथवा पाणीपट्टी भरून या योजनेच्या पुढील कार्यवाहीसाठी पाणीपुरवठा विभाग यांना सहकार्य करण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.