सोलापूर, दि.5 (जिमाका) - जादूटोणा, अघोरी प्रथा या समाजासाठी घातक असून राज्यात असले प्रकार वाढता कामा नये यासाठी अस्तित्वात असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.तसेच जादुटोणा विरोधी कायदाबाबत जनसामान्यांना विविध माध्यमातून माहिती देण्यासाठी अधिक जनजागृतीबाबत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या.
जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी समाज कल्याणचे सहा. आयुक्त नागनाथ चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरिक्षक सुहास जगताप, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्यात जादूटोणा, अनिष्ट व अघोरी प्रथा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. तसेच या कायद्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असून, जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार व प्रसारा सोबतच कायद्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अनिष्ट प्रथा परंपरा व जादूटोणा समाजाच्या प्रगतीत मोठा अडथळा निर्माण करतात. यासाठी समाजाने सुद्धा प्रत्येक घटनेकडे जागृक नागरिक म्हणून पहावे असेही प्र. जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी सांगितले.
तसेच जादुटोणा विरोधी कायद्याचा प्रसार करण्यासाठी नेमलेल्या समितीत विभागीय समन्वयक म्हणून अशासकीय सदस्यांची नियुक्तीचे प्रस्ताव लवकरात लकवर पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जादूटोणा विरोधी कायदा बैठकीनंतर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली या सभेत अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्ह्यात ॲट्रॉसिटीचे घडलेले गुन्हे याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यातबाबत सूचना करण्यात आल्या.