पंढरपूर (प्रतिनिधी) - उन्हाच्या झळांनी कासावीस होत असणाऱ्या पंढरपूरकर नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे, पंढरपूर नगरपालिकेचा सुमारे तीन वर्षांपासून बंद पडलेला जलतरण तलाव आता मंगळवार दिनांक ५ मे पासून पुन्हा सुरू होणार आहे.
ऐन उन्हाळ्यात स्विमिंग पूल बंद पडल्याने पोहण्याचे शौकीन लोक नगरपालिका प्रशासनाच्या नावाने बोटे मोडीत होती. पण परदेशी अकॅडमी यांच्या सहकार्याने जलतरण तलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या बंद पडलेली मशिनरी व तलाव स्वच्छ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मिनी ऑलिंपिक धर्तीवर हा सुसज्ज जलतरण तलाव २०१० साली सुरू करण्यात आला होता. दारे खिडक्या, शौचालय, स्नानगृह दुरुस्ती, तुटलेल्या फरशा बदलणे, पाणी बदलण्याची यंत्रे दुरुस्त करणे, वाढलेली रानटी झाडे, झुडपे, गवत काढून परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. उन्हाळा सुरू झाला की अनेक हौशी लोकांना पोहण्याचा तसेच मनसोक्त पाण्यात विहार करावा वाटतो, तर पालकांना उन्हाळी सुट्टीत आपल्या चिमुकल्यांना पोहायला शिकवायचे असते. आता पालकांची इच्छा पूर्ण होणार असे दिसत आहे.
कोरोना काळात सलग तीन वर्षे तलाव बंद असल्याने अनेक गैरप्रकार घडले आहेत. पाण्याच्या मोटारी, इतर साहित्य चोरीला गेले आहे. भिंतीवरून आत उड्या टाकून काही विघ्नसंतोषी मंडळींनी सामिष भोजन व मद्यपान पार्ट्या केल्या असल्याच्या खुणा दिसून येत आहेत. परदेशी स्विमिंग अकॅडमी यांना ९ वर्षाचा ठेका देण्यात आला असून त्यांची सुसज्ज यंत्रणा पाहून तलाव उत्तम रीतीने सुरू राहील.