३० बटूंचा व्रतबंध सोहळा;
सर्व बटूंची व भगवान परशुरामांच्या मूर्तीची सवाद्य भव्य शोभायात्रा
पंढरपूर (प्रतिनिधी) - प्रतिवर्षाप्रमाणे पेशवा युवा मंचच्या वतीने राबविण्यात येणारा सामुदायिक व्रतबंध सोहळा या वर्षी दि. 10 मे 2023 रोजी संपन्न झाला. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या ३० बटूंचा व्रतबंध सोहळा येथील पद्मशाली धर्मशाळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रत्येक बटूस मंचच्या वतीने सोवळे, उपरणे, पळी, पेला, ताम्हण व संधीची पोथी देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीब्रह्मचैतन्य भक्त मंडळाचे श्री. मुकुंदराव परिचारक होते .याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे मा. आमदार प्रशांतराव परिचारक ,वेदमूर्ती आर. राजगोपालन, डॉ. गणेश बेणारे, पंढरपूर क्रेडाई चे अध्यक्ष श्री. अमित शिरगावकर, उद्योजक भागवत बडवे महाजन आदी मान्यवरांसह शहरातील समाज बांधव उपस्थित होते. पेशवा युवा मंचच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम गेले बारा वर्षे राबविण्यात येत आहे.
या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे, असे कार्यक्रम अनुकरणीय आहेत असे म्हणून या उपनयन सोहळ्याचा गौरव मान्यवरांनी केला. मुंजीचे पौरोहित्य वेदमूर्ती आकाश पारनेरकर, प्रदीप कुलकर्णी, निखिल कुलकर्णी व विठ्ठल रुक्मिणी वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांनी केले . सूत्रसंचालन विशाल तपकिरे यांनी केले. पेशवा युवा मंचचे अध्यक्ष मयूर बडवे यांनी सर्वांचे आभार मानले.
सायंकाळी सर्व बटूंची व भगवान परशुरामांच्या मूर्तीची सवाद्य भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेशवा युवा मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.