पंढरपूर, दि. 23 (उ. मा. का.) : ‘हरित वारी, स्वच्छ वारी’ या संकल्पनेवर आधारित पर्यावरण संवर्धनाचा जागर आषाढी वारीमध्ये होणार आहे. गतवर्षी दहा हजार वृक्ष लागवड पालखी मार्गावर प्रशासनाकडून करण्यात आली होती. यंदा अधिकची वृक्ष लागवड करून प्लास्टिक संकलन केंद्रे उभा करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मूलभूत व आरोग्य विषयक सुविधांसह हिरकणी कक्ष उपलब्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सांगितले.
आषाढी वारी नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, निवासी उपल्हिाधिकारी शमा पवार, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव आणि नामदेव टिळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे आणि सुनिल वाळूंजकर, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, कबीर महाराज, राणा महाराज वासकर, विश्वस्त, फडकरी, दिडींकरी, नागरिक, व्यापारी तसेच संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, महिला भाविकांच्या आरोग्य विषयक बाबी, स्वच्छता तसेच सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित ठिकाणी महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा देण्यात येणार आहेत. आषाढी वारी सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यामध्ये पिण्याचे पाणी, शौचालये, अखंडित वीज पुरवठा, सुरक्षा या बाबींना प्राधान्य द्यावे. पालखी मुक्कामाची व विसावा तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची कामे करण्याबरोबरच पालखी विश्वस्तांनी सुचविलेली कामे प्राधान्याने व वेळेत पूर्ण करावीत. पालखी मार्गावर भाविकांना मुबलक व स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी पाण्याचे स्त्रोत शुध्दीकरणाबाबत नियोजन करावे. नगरपालिकेने चंद्रभागा वाळवंट व नदीपात्र स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. पालखी मार्गावर उपलब्ध सुविधेबाबत दिशदर्शक फलक लावावेत, अशा सूचनाही श्री. स्वामी यांनी यावेळी दिल्या.
या जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत वारकरी, भाविक व नागरिकांच्या सुविधेला प्राधान्य दिले जात आहे. पालखी मार्गावरील बंदोबस्त तसेच वाहतूक याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असून यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. राज्य शासनाने आषाढी यात्रा कालावधीत जादा एस.टी. बसेस सोडण्याचे नियोजन केले असून यात्रेत महिला भाविक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता लक्षात घेवून महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच शहरात 162 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. आषाढी वारी सोहळा निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी वारकरी, भाविकांनी तसेच नागरिकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्ग, पालखी मुक्काम, रिंगण सोहळा या ठिकाणी नगरपालिका, आरोग्य विभाग, मंदिर समिती, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, ग्रामपंचायत विभाग, महावितरण आदि विभागांनी करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली . तसेच बैठकीत विश्वस्त, फडकरी, दिडींकरी, व्यापारी व नागरिकांनी सूचना मांडल्या. या सूचनांबाबत तात्काळ संबंधित विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश श्री. स्वामी यांनी दिले.
0000000