मुंबई (प्रतिनिधी) पंढरपूर कॉरिडॉर नवीन आराखडा तयार करायच्या आधी स्थानिक लोकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात यावे,असे मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना व्यक्त केले.पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास शिखर समितीच्या बैठकीपूर्वी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व पंढरपूर येथील स्थानिकांना विचारून विकासाबाबत पुढील निर्णय घेण्याची सूचना दिली.
आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी बैठकांचे आयोजन सर्व पातळीवर होत आहे. आज मंगळवार दिनांक २३ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास शिखर समितीची बैठकीचे आयोजन मंत्रालय येथे करण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बाहेर देशात असताना देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली . या दरम्यान पंढरपूर विकासाबाबत डॉ.गोऱ्हे यांनी बैठका घेऊन मागणी केलेल्या ७३ कोटीचा निधी मंजूर केला होता याची आठवण श्री शिंदे यांना करून दिले. याचा उपयोग नवीन आराखड्यात करून घेण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केली.
त्याचबरोबर नवीन आराखडा तयार करताना पंढरपूर स्थानिक
रहिवाशी यांना विचारून निर्णय घेण्यात यावा. विठ्ठल रुक्मिणी मंदिर चा आराखडा मंजुरीच्या मधील सर्व अडथळे दूर करावेत व आराखडा तात्काळ मंजूर करावा. हा आराखडा अंमलबजावणी साठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी मार्गाचे रुंदीकरण करावे. महिलांसाठी फिरते रुग्णालय उपलब्ध करून द्यावे. मैला व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन अत्यंत नेटके करावे अशी विनंती देखील डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांना केली.