पंढरपूर - देशाचे नेते श्री.शरद पवार यांच्या हस्ते वेणूनगर येथील श्री विठ्ठल सह.साखर कारखाना येथे बायो – सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा रविवार, दि.७ मे २०२३रोजी सकाळी ९ वा. कारखाना स्थळावर संपन्न होणार आहे.
श्री.पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे अभिजीत पाटील यांनी भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली असता पवार यांनी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
श्री. पवार हे दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना श्री. अभिजित पाटील यांच्या ताब्यात आल्यापासून ते सतत संस्थेच्या प्रगतीसाठी काम करीत असून खाजगी उद्योजकांच्या मदतीने बायो सी एन जी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामुळे युवकाच्या हाताला काम मिळणार असून सी एन जी पंप उभा राहू शकतो. श्री. पवार वेळोवेळी पाटील यांना साखर कारखानदरीच्या बाबतीत मार्गदर्शन व सहकार्य करतात.
रविवार दि ७ मे रोजी कारखान्याच्या कार्यक्रमात श्री. अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार की कोणता निर्णय घेणार याविषयी पंढरपूरकर नागरिकांना प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच श्री. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अन्य कोणाकडे देणार असल्याचे मुंबई येथे जाहीर केल्याने ते काय बोलणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.