पंढरपुरात दोघा सख्या भावांना अटक
पंढरपूर (प्रतिनिधी) - वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोटारसायकल चालविण्याचा परवाना मागितल्याचा राग आल्याने पोलिसाच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार येथील सावरकर चौकात घडला आहे. याप्रकरणी दोघा भावांविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
प्रविण तानाजी लवटे (वय २३) व नितीन तानाजी लवटे (वय २२, दोघे रा. महुद, ता. सांगोला) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. रविवारी (दि. ७) सकाळी ९ वाजता येथील सावरकर चौकात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी विजय कोळवले व आवटे असे दोघेजण वाहतूक नियमनाचे काम करीत होते. सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास एम. एच. १३ / ए. आर. ८९८३ या मोटारसायकलवरून प्रविण लवटे हा सदर चौकात आला. पोलिसांनी मोटारसायकल अडवून त्याच्याकडे लायसनची मागणी केली. त्याच्याकडे लायसन नसल्याने पोलिसांनी त्याला मोटारसायकल बाजुला घेण्यास सांगितले. त्यानुसार त्याने मोटारसायकल बाजुला लावली आणि तो निघून गेला.
त्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास तो परत आला व कांही न बोलता मोटारसायकल घेऊन जाऊ लागला. त्यावेळी पोलिसांनी पुन्हा त्याच्याकडे लायसनची मागणी केली असता हुज्जत घालत त्याने अचानक वाहतूक पोलीस विजय कोळवले यांच्या कानाखाली चापट मारली. या प्रकारानंतर दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. यादरम्यान त्याने आपला भाऊ नितीन लवटे याला मोबाईलवर कॉल करून बोलावून घेतले. त्यानेही घटनास्थळी येऊन पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले, अशा आशयाची फिर्याद कोळवले यांनी दाखल केली आहे.