पंढरपूर( प्रतिनीधी) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीबरोबर दूध व्यवसाय करीत असून सरकारने दुधाचे भाव कमी केल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे, सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसत असून शिंदे- फडणवीस सरकार हे खाजगी दूध संस्थांच्या पाठीशी उभा राहत असल्याचा आरोप श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी केला आहे.
आज ते पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर- मंगळवेढा रोड वरील अनवली चौकात दुधाचे दर कमी झाल्याच्या निषेधार्थ भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकरी /कार्यकर्त्यांसह मोठे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. शिंदे - फडणवीस सरकारने दुधाचे दर पुढील काळात न वाढवल्यास पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे जन आंदोलन उभा करू असा इशारा भगीरथ भालके यांनी दिला आहे.
यावेळी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी काही गडबड होऊ नये म्हणून दक्षता घेण्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवला होता .पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दूध आंदोलनाकासमोर येवून निवेदन स्वीकारले. त्याचबरोबर यावेळी विठ्ठलची माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सिद्धेवाडी, एकलासपूर, अनवली ,मलेवाडी शरदनगर येथे सतत लहान मोठे अपघात होत असल्याने काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी संबंधित खात्याच्या विभागाने त्वरित याची दखल घेऊन त्या त्या गावातील चौकाच्या ठिकाणी गतिरोधक बसण्याची मागणी मोर्चाच्या वेळी जमलेल्या कार्यकर्त्यांसमवेत करण्यात आली .यावेळी आंदोलन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.