पंढरपूर दि. 06 : शासनाच्या विविध योजनांचा लाभ नारिकांना थेट उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तालुकास्तरीय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम 12 जून 2023 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत मंगळवेढा येथील नगरपालिका शाळा क्रमांक 1 या ठिकाणी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली आहे.
‘ शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत शासनाच्या सर्व विभागांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांना कमी वेळेत विविध शासकीय योजनांचा एक छत्री लाभ मिळावा हा अभियानाचा मुख्य उद्देश असून, मंगळवेढा तालुक्यातील सर्व नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.
या अभियानात तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, महिला व बालविकास, आरोग्य विभाग पोलीस विभाग, भूमी अभिलेख, पशुधन विकास विभाग,नगरपालिका, ग्रामीण पुरवठा, उजनी कालवा, निबंधक कार्यालयश् वन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आदी विभाग सहभागी होणार आहेत. सदर विभागांशी निगडित योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधावा जेणेकरून नागरिकांना कार्यक्रमाच्या दिवशीच योजनेचा अंतिम लाभ देता येईल.
शासन आपल्या दारी या अभियानाचा मंगळवेढा तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.