पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक सुरु आहे यामध्ये विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी या साखर कारखान्याची देणी आपण देवू असे सांगत आहेत; आम्ही काही भागातील सभासदांचे बील वाटप झाले आहे. तर काही भागातील वाटप सुरु आहे त्यामुळे आपण जी आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. याबाबत तुमच्या आश्वासनाची आमच्या सभासदांना गरज नसून त्यासाठी आम्ही पुर्णपणे सक्षम आहोत असा सल्ला समाधान काळे यांनी दिला आहे.
सध्या कारखान्यावर चुकीचे पध्दतीने टिका करुन मते मिळविण्यासाठी विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. त्या भुलभुलय्याला आमचा सभासद कदापी भुलणार नाही. उलट आपण ताकद वाढविण्यासाठी दिपक पवार यांचेशी युती केली आहे. परंतू ती युती अनैसर्गिक आहे आणि विठ्ठलच्या निवडणुकीत गुप्तपणे केलेल्या सहकाऱ्याची प्रवेश देवून बक्षिस मिळविले आहे अशी टिकाही दिपक पवार यांचेवर काळे यांनी केली आहे.
आमच्या सहकार शिरोमणी साखर कारखान्यावर चुकीचे आकडे सांगून कर्जाबाबत सभासदांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. यामध्ये कारखान्यावर साडे चारशे कोटी रुपयाचे कर्ज असल्याची बतावणी अभिजीत पाटील यांचेकडून करण्यात येत आहे. परंतू सभासद यांच्यापुढे कारखान्याच्या वार्षिक अहवाल गेला आहे त्यामुळे तुमच्या भंपक बाजीला सभासद थारा देणार नाही असेही काळे यांनी सांगीतले. प्रत्यक्षात 259 कोटी रुपयांचे कर्ज होते त्यापैकी 43 कोटी रुपयांची परतफेडी या वर्षी करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीत 215 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा खुलासा समाधान काळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
आमच्या कारखान्यावर कर्ज असल्याचा डांगोरा पिटण्याचे काम अभिजीत पाटील यांचेकडून सुरु आहे. मात्र विठ्ठलमध्ये आपण सत्तास्थान बसल्यावर संचालकांच्या नांवे कारखान्यासाठी रु.40 कोटीचे कर्ज उचलले आहे. ते संचालकांचे उतारे मोकळे करावे असा सल्लाही समाधान काळे यांनी दिला आहे.
या निवडणुकीच्या निमिताने कारखान्यातील देणी आपण देणार असल्याचे सांगत असला तरी या निवडणुकीत चेअरमन पदाचा नेमका चेहरा कोण ? हे निवडणुकीच्या दरम्यान सभासदांना समजावे असेही काळे यांनी म्हटले आहे. स्व.वसंतदादा यांच्या राजकीय कारकिर्दीत साथ दिलेले बाळासाहेब कौलगे, बिभिषण पवार यांनी आम्हांलाही आर्शिवाद दिलेले होते. त्या मोबदल्यात त्यांनाही योग्य पदे देवून सन्मान ठेवला होता परंतू ते कोणत्या अमिशाला बळी पडून आमच्या पासून बाजूला जात अभिजीत पाटील यांचेकडे गेले आहेत. याबाबत त्यांच्या गावातील लोकांकडून याबाबतची माहिती मिळणार आहे.
मागील वर्षी झालेल्या विट्ठलच्या निवडणुकीत सांगोला साखर कारखान्याच्या ऊस बील वाटपासाठी पंढरपूरातून टांगा फिरविण्याचे सोंग केले होते. यावर्षीच्या बीलाची काय अवस्था झाली आहे.याबबतही अभिजीत पाटील यांनी खुलासा करणे गरजेचे आहे असेही समाधान काळे यांनी यावेळी सांगीतले आहे.