सरकोली येथील बैठकीत अभिजीत पाटील यांनी केला काळे यांच्यावरच आरोप
पंढरपूर प्रतिनिधी:- श्री विठ्ठलचे चेअरमन हे विठ्ठल परिवारातील विधानसभेचे उमेदवार असतात. हे सत्य असतानाही 2004 साली स्व. भारतनाना भालके यांना खऱ्या अर्थाने परिवाराकडून चेअरमन कल्याणराव काळे यांनी खो देण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यावेळी विठ्ठल परिवारात दोन उमेदवार असल्याने मतविभागणी होऊन स्व.भारतनाना यांना पराभव पत्करावा लागला होता. असा आरोप चेअरमन अभिजीत पाटील यांनी काळे यांच्यावर केला आहे.
सहकार शिरोमणीचे निवडणुकीतील परिवर्तन पॅनलचे चिन्ह घड्याळ आले असून उमेदवाराच्या प्रचारासाठी रांझणी येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. सरकोली येथे सभासदासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, डॉ. बी.पी.रोंगेसर, दिपक पवार यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे संचालक मंडळ व सर्व उमेदवार उपस्थित होते.
पुढे बोलताना चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की,स्व.वसंतराव काळे यांच्या निधनानंतर सहकार शिरोमणीवर कल्याणराव काळे हे चेअरमन होते. आणि विठ्ठलवर स्व . भारतनाना भालके असे दोन्ही चेअरमन आपल्याच विठ्ठल परिवारातील होते. परंतु भारतनाना भालके यांना कल्याणराव काळे यांनी 2004 साली सांगितली होते; की विठ्ठल कारखान्याचा जो चेअरमन असतो तोच तालुक्याचा आमदार असतो. परंतु कल्याणराव काळे यांनी त्यावेळी ऐकले नाही. परिचारक पार्टीतील राजूबापू पाटील यांना इकडे आपल्या विठ्ठल परिवारात आणून आमदारकीची उमेदवारी दिली. त्यावेळीच खऱ्या अर्थाने आपला परिवार काळेंनी फोडण्याचे काम केले आहे.
आज मी सुद्धा भारतनाना भालके यांचा कार्यकर्ता आहे.त्यामुळे विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये नानांचे आशीर्वाद मिळाले.त्याचप्रमाणे सरकोली गावातून सभासद व जनता सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आशीर्वाद देईल व या नानांच्या आशीर्वाद मुळे आम्ही नक्कीच सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणूक जिंकू. असा आशावाद चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी ऍड दिपक पवार यांनीही कल्याणराव यांच्यावर टीका करीत अनेक प्रश्न विचारले. स्व. वसंतदादांनी तयार केलेले निष्ठावंत सच्चे कार्यकर्ते सध्या तुमच्याकडे किती शिल्लक आहेत.हे तुम्हीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तुम्ही निष्ठावंत कार्यकर्त्याचा गळा घोटला आहे. निष्ठा निष्ठा या नावाखाली निष्ठावंत सच्चा कार्यकर्त्यांना तुम्ही बाजूला सारले आहे. त्यामुळे निष्ठेच्या गोष्टी तुम्ही करू नका असे प्रतिपादन दीपक पवार यांनी सहकार शिरोमणी सरकोली येथील निवडणूक प्रारंभीच्या सभेमध्ये केले.
दीपक पवार पुढे बोलताना म्हणाले, सभासद आणि कामगारांच हित तसेच या दोघांचे भविष्य व संसाराचा गाडा भविष्यकाळात उज्वल करण्यासाठी तसेच त्यांचे हित जोपासण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत .भविष्यकाळाचा विचार करून सभासदांनी कामगार व सभासदांचे हित जोपासण्यास आमच्या सोबत यावे. सिताराम सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी अनेक लोकांकडून पैसे घेतले होते. त्यामुळे आजपर्यंत आमच्या संपर्कात आलेल्या आठ हजार लोकांचे 23 कोटी रुपये आजपर्यंत त्यांना मिळवून दिले आहेत. राहिलेल्या तीनशे ते चारशे लोकांना सुद्धा या सहकार शिरोमणी निवडणुकीच्या विजय गुलाला नंतर मला तुम्ही संपर्क करा त्यांची सुद्धा पैसे परत घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.असा विश्वासही यावेळी त्यांनी दिला.