नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
पंढरपूर (प्रतिनिधी) - आषाढी यात्रेसाठी पंढरीत लाखो भाविकांची मांदियाळी जमत आहे. दर्शनासाठीची दर्शन रांग लांबच लांब वाढत असल्यामुळे पंढरीत आलेला प्रत्येक भाविक हा श्रीसंत नामदेव पायरी येथूनच भगवंताचे दर्शन घेतो. या श्रीनामदेव पायरी शेजारीच असलेल्या नगरपालिकेच्या स्वच्छता गृहात गाळेधारकांकडूनच अतिक्रमणाचा विस्तार होत असल्याचे दिसते. तसे पाहता गाळेधारकांना जाण्या- येण्यासाठी नगरपालिकेचेवतीने चार पायऱ्यांचा जिना अस्तित्वात आहे. परंतु दुकानदार मात्र त्या जिन्याच्या पुढे आपले दुकान मांडून अतिक्रमण करीत आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
मंदिरा शेजारीच असलेल्या स्वच्छतागृहात जाण्यासाठी रस्ताच सापडत नाही. तेथील व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे स्वच्छतागृह कुठे आहे हेच भाविकांना कळत नाही.
नगरपरिषदेने गरज नसताना गाळेधारकांच्या पुढे रस्त्यावरती भिंत बांधल्यामुळे अतिक्रमणाला नगरपालिका खत पाणी घालत आहे असे वाटतय.,.. गाळेधारकांच्या पुढे जी गरज नसताना बांधलेली भिंत आहे त्या भिंतीच्या मागून व पुढून दोन्हीकडून अतिक्रमण होत आहे. श्रीनामदेव पायरी शेजारील अतिक्रमणे काढून महिला, वृद्ध, बाल वारकरी भक्तांना स्वच्छता गृहाचा रस्ता दिसावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.