लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेवर गणेश अंकुशराव यांची संतप्त प्रतिक्रिया !

0
घाटावरून परतले, पण चंद्रभागेच्या पात्रातील घाण पहायला नाही थांबले!

      पंढरपुर (प्रतिनिधी) - आज पंढरपूर शहर दौर्‍यावर खासदार जयसिध्देश्‍वर स्वामी, आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाष देशमुख आले होते. आषाढी वारीच्या पार्श्‍वभुमीवर त्यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा होता; परंतु चंद्रभागेच्या पात्रातील घाणीचे साम्राज्य पहाण्यासाठी त्यांना वारंवार विनंती करुनही ते घाटावरुन परतले पण, नदीच्या पात्रात उतरले नाहीत! त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या या उदासिन भुमिकेमुळे महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी ‘हे कसले लोकप्रतिनिधी?’ असा सवाल  करत एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गोपाळपूरच्या बंधार्‍याचे दरवाजे काढून मुंढेवाडीच्या बंधार्‍यावर हे दरवाजे बसवल्याने  गोपाळपूरातून येणारे सांडपाणी चंद्रभागेच्या पात्रात साठून तुंबले आहे. आषाढी वारी तोंडावर आलेली असतानाच चंद्रभागेच्या पात्रातील पाण्यात सोडण्यात येणार्‍या सांडपाण्यामुळे प्रचंड घाणीचं साम्राज्य असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आढळून येत आहे, याकडं प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने आपण चंद्रभागेच्या पात्रात येऊन पाहणी करावी व चंद्रभागेची स्वच्छता करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी  विनंती गणेश अंकुशराव यांनी वरील सर्व लोकप्रतिनिधींना केली परंतु त्यांनी हे नंतर कधी तरी बघू म्हणत कलाटणी देऊन पलायन केले. यावेळी भाजपाचे पदाधिकारीही उपस्थित होते. यानंतर गणेश अंकुशराव यांनी एक प्रसिध्दीपत्रक जाहीर करुन याद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

चंद्रभागेतील घाण पाण्यामुळे भाविकांच्या अंगाला खाज सुटत असून अनेक भाविकांना त्वचारोग होऊ लागले आहेत, भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही गंभीर बाब लोकप्रतिनिधींनी स्वत: नजरेखालून घालणं आवश्यक होतं परंतु त्यांनी टाळाटाळ केल्याने त्यांना भाविकांच्या आरोग्याबाबत व सुरक्षेबाबत, भाविकांच्या सोयी-सुविधेबाबत किती आस्था आणि काळजी आहे ते दिसून आले, या प्रश्‍नाबाबत मी पालकमंत्र्यांकडेही तक्रार केलेली आहे, आता ते तरी याची दखल घेतात का नाही? ते दिसेलंच परंतु सद्यस्थितीत तरी लोकप्रतिनिधींना भाविकांच्या सोयी-सुविधेबाबत कोणतेही सोयरसुतक नसल्याचे ठळकपणे दिसत असून वरपांगी भाविकांच्या सोयीसुविधांबाबत गाजावाजा करत प्रसिध्दी करुन घेणारांचेे ‘खरे’ चेहरे कसे आहेत ते जनतेनं आणि भाविकांनीच पहावे. असे मत या प्रसिध्दीपत्रकात गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)