आळंदीत_नेमकं_काय_घडलं ?
ग्राऊंड रिपोर्टचा प्रमाणिक प्रयत्न...!
पार्श्वभूमी : - दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने आळंदीत संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हा न्यायाधिश यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली यात आषाढी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित मानाच्या रथापुढील १ते २७ व रथामागील १ ते २० अशा एकूण ४७ दिंडयांना आमंत्रण होते. यात संस्थानने प्रस्थानसोहळ्यावेळी देऊळवाडा (मंदिराच्या आतील परिसर ) गर्दी प्रचंड होते यासाठी या परिसराची क्षमता अंदाजे पाच हजार लोकांची असून यानुसार संख्या नियंत्रित ठेवली तर भविष्यात चेंगराचेंगरी सारखे प्रसंग येणार नाहीत. असा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला.वास्तविक ४७ दिंड्याच प्रस्थानला ठेवण्याचा निर्णय संख्यात्मक नियंत्रणासाठी पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेने काही वर्षांपूर्वी स्वतःहून घेतला होता. यानंतर एक महिन्यापुर्वी दिनांक २४ मे रोजी एक बैठक झाली यात जेष्ठ मानकरी यांनी केलेल्या अनेक महत्त्वपूर्ण सुचना बाजूला ठेवून ७५ हि वारकरी संख्या प्रत्येक दिंडीसाठी निश्चित करण्यात आली. याला नाईलाजास्तव सर्वांनी सहमती दर्शवली. दिंड्यांना संख्या निश्चित केली मात्र प्रस्थानवेळीचे इतर निमंत्रित , अनिमंत्रीत यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी काय उपाययोजना केली याचे स्पष्टीकरण मिळाले नाही.
प्रस्थानचा दिवस :
दिवस उजाडला प्रस्थानचा जशी जशी प्रस्थानची वेळ जवळ येत होती तशी तशी मंदिर परिसरात अतिरिक्त गर्दी वाढत होती. पोलिसांनी चारी दिशांना बॅरीगेटिंग बांधून मानच्या दिंड्यांशिवाय कोणीही प्रवेश करणार नाही याची काळजी घेत होते.(पण अनेक मान न मान मै तेरा मेहमान अशा थोर थोर राजकीय,अराजकिय विभूती थेट आत दाखल होत होत्या असे कळाले. ) असो. अशाप्रकारे तयारी सुरु असताना पान दरवाज्याजवळ काही घुसखोरांनी निमंत्रीतांचे जे वेगळे रंगीत पास होते त्या पासचे रंगीत झेराॅक्स काढून डुप्लिकेट पास आणल्याचा आरोप पोलिसांनी केला व मोठ्या प्रमाणात बाचाबाची सुरु झाली.यात ज्यांच्याकडे दिंडीचे वेगळे संस्थानच्या शिक्याचे पास होते त्यांनाही पोलिसांनी मज्जाव करण्यास सुरुवात केली. या पासमुळे अभुतपुर्व गोंधळास व रेटारेटीस सुरुवात झाली. यात पास असणारेही अनेक जण चेंगराचेंगरीच्या भितीपोटी मागे निघून गेले.
संस्थान कमिटीचा समन्वयाचा अभाव - श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने जसे १ ते ४७ दिंड्यांना बैठक घेऊन नियोजन सांगितले तसे एखादी सार्वजनिक बैठक घेऊन किंवा पत्रकार परिषद घेऊन सर्वांना प्रस्थान सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाचे प्रसिद्धीकरण करणे आवश्यक होते. संस्थानने आपल्या वर्षासनधारक, सेवक याबरोबरच आता मानकरी व दिंडी मालक या सर्वांना 'विशिष्ठ धाक' दाखवत हाकण्याचा जो प्रकार सुरु केला आहे यात आपण सर्वसामान्य वारकऱ्यांना उत्तर देण्यास संस्थान म्हणून बांधील आहोत याचा बहुतेक यांना विसर पडला आहे असे वाटते. त्यामुळे प्रस्थान नियोजन नेमके कसे याची माहिती न मिळाल्याने ७५ लोकच का ? ४७ च दिंड्या का ? आम्ही का नाही या प्रश्नांमुळे मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरला. पोलिसांना फक्त पास बघूनच आत सोडण्याच्या सुचना केल्याने व वारकऱ्यांमधील विशेषतः आळंदीत शिकणारा तरुण विद्यार्थी क्रोधीत झाला.
पोलिसांचा अतिरेक :-
हा मुद्दा खरंतर स्वतंत्र लेखाचा विषय आहे.परंतू इथे थोडक्यात सांगायचे तर सहिष्णू व आपल्या नितीमत्तेचा धाक ठेवणार्या वारकऱ्यांवर धाक धपटशाही करण्याचा 'एक्स्ट्रा काॅन्फीडन्स ' पोलिसांना आला तो कोरोना काळातील लाॅकडाऊन पासून. देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो ।। म्हणणारा वारकरी या काळात हि आपली वारीची परंपरा जोपासण्यासाठी प्रयत्न करत होता. पण वारकऱ्यांच्या माहेरी पंढरपुर सारख्या ठिकाणी हि त्यांना आम्ही आत येऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया लोकप्रतिनिधी देत होते. पोलिसांना ऑर्डर दिल्या जात होत्या, दिसले वारकरी कि धरा व परत पाठवा ऐकत नसतील तर डांबून ठेवा. झालं वारकऱ्यांच्या सेवेत 'पोलिस परवानगी ' हा शब्द तेव्हा पासून आला. किती लोक असणार ? कुठे जाणार ? कसे जाणार ? एक ना अनेक प्रश्न आणि याचं कहर करणारं उदाहरण म्हणजे आषाढी एकादशीच्या प्रदक्षणेवेळी चंद्रभागा पात्रात कोणीही नसताना परवानगीच्या वारकऱ्यांनाही चंद्रभागेस स्पर्श करण्यास केलेला मज्जाव ! चुकून एखादा पंढरपुर मधील नागरिक प्रदक्षणा करता यावी म्हणून दिंडीत सहभागी झाला तर त्याला अर्वाच्य भाषेत बोलून बाहेर काढण्यापर्यंत मजल पोलिसांची गेली ती लाॅकडाऊनमध्येच. तेव्हा पासून वारकऱ्यांचा धाक पोलिस यंत्रणेला वाटेनासा झाला. याचाच परिणाम म्हणजे काल आळंदीत पोलिसांनी केला बळाचा वापर. हे अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी हि खाजगीत मान्य केले.पास असणाराच 'वारकरी' बाकीचे चोरच (?) अशा प्रकारे वागणूक पोलिस प्रत्येकाला देत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. वास्तविक पाहता संपुर्ण महाराष्ट्रात पोलिसांना कोणताही अतिरिक्त ताण न पडणारा सोहळा म्हणजे वारी. किमान सोहळ्यात चालणर्या प्रत्येक दिंडीला स्वयंशिस्त असते नियंत्रणासाठी चोपदार असतात. कुठंही घाई गडबड गोंधळ होत नाही. मात्र पोलिसांचे प्रत्येक वेळी नवनवीन अधिकारी येतात व त्यांचे स्वतंत्र डोके चालवतात यात त्यांना कोणाचा कोणता मान आहे, परंपरा काय आहे याच्याशी काही सोयरसुतक नसते . यामध्ये पोलिसांनी किती हस्तक्षेप करावा यावर संस्थानचे नियंत्रण असायला हवे मात्र आपल्या सेवक व मानकर्यांवर मर्यादा आणून सगळे नियंत्रण पोलिसांच्या हवाली करण्याचे संस्थानचे धोरण अत्यंत चुकीचे आहे अशी संतप्त प्रतिक्रिया जेष्ठ मानकरी व्यक्त करत आहेत.
विद्यार्थ्यांची बाजू : -
संस्थेच्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना बैठकीला न बोलावता पासचा निर्णय घेतला. दरवर्षी प्रमाणे विद्यार्थी संस्थेसमोर गोळा झाल्यावर त्यांना निर्णय कळविण्यात आला. चोपदार येऊन मी तुम्हाला मध्ये घेऊन जातो ती जबाबदारी माझी असे अश्वासन देऊन गेले. त्यानंतर मध्ये जाण्याच्या आनंदात आम्ही भजन सुरू केले. एक तास भजन झाल्यावर पण सोडण्याची काही हालचाल दिसत नसल्यामुळे विद्यार्थ्यांत चुळबुळ वाढू लागली. त्यानंतर विश्वस्तांनी येऊन एकाही विद्यार्थ्याला मध्ये सोडणार नाही काय करायचे ते करून घ्या अशी धमकी दिली. पोलिस अधिकारी जे होते त्यांनी आमच्या कडे खुप मनुष्यबळ आहे हे लक्षात ठेवा अशी चार वेळा धमकी दिली. विद्यार्थ्यांनी आम्ही बळ वापरण्यासाठी गुंड नाहीत असे सांगितले. आमच्यामधून पास असणार्या एका माणसाला सोडताना बॅरिकेट थोडे उघडे केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांना जाण्यासाठीच उघडले आहे असे वाटून मागचे सगळे मंदिरात जाण्यासाठी पुढे आलो. आणि पुढच्या घटना घडत गेल्या. दोन विद्यार्थ्यांना मारहाण झाली आणि एकाला ताब्यात घेतलं. मी तिथंच होतो आणि सर्व प्रत्यक्ष पाहिलंय पण त्याचा परिणाम असा होईल वाटलं नव्हतं . - प्रत्यक्षदर्शी सहभागी विद्यार्थी
वरील प्रतिक्रिया मुद्दाम आहे तशा स्वरुपात दिली आहे.जेणेकरुन विद्यार्थ्यांची थेट भुमिका लोकांपर्यंत जावी. मात्र यात काही गोष्टींची चुक विद्यार्थ्यांची आहे. आम्हाला बैठकीस का बोलावले नाही हा आरोप चुकीचा आहे. संस्थेची स्वतंत्र दिंडी नाही संस्थेचे बहुतांश विद्यार्थी शेंडगे दिंडीत चालतात . नियमानुसार सदर दिंडीस बैठकीचे आमंत्रण हि होते व पासही दिले गेले . विद्यार्थ्यांची विनंती हि होती कि आम्ही वर्षभर माऊलींच्या मंदिरात सेवेसाठी उपस्थित असतो. वर्षभराचे कार्यक्रम , गुरुवारची पालखी यासाठी शेकडो विद्यार्थी सहभागी होतात व हेच विद्यार्थी प्रस्थान सोहळ्यातही आनंदाने दरवर्षी हजर राहतात.परंतू ७५ मर्यादीत पासची त्यांना अचानक मिळालेली माहिती, मर्यादेमुळे दिंडीतील पास मिळेनात , स्वतंत्र पास संस्थानने देऊ केले पण ७५ च त्यामुळे ७५ पासची मर्यादा आम्हाला नको आमचे सर्व अडीचशे तीनशे विद्यार्थ्यांना पास द्या या भुमिकेमुळे वातावरण संतप्त झाले. विद्यार्थी ऐकेनात त्यामुळे संस्थानने पोलिसांवर भार टाकून पास शिवाय कोणालाही आत घेऊ नका हि सुचना दिल्याने विद्यार्थ्यांचा राग अनावर झाला व बाचाबाची सुरु झाली. थेट पोलिसांबरोबर त्याचे पर्यावसन झाले धक्काबुक्कीत. यातच पुढे येऊन आग्रही भूमिका मांडणाऱ्या तीन चार विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व दुसरीकडे नेऊन जोरदार मारहाण केली त्यात या विद्यार्थ्यांचे कपडे फाटले व ते जखमीही झाले. हे करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला ? विद्यार्थी म्हणजे तुम्हाला कोणी गावगुंड वाटले का ? आपलं घरदार सोडून वारकरी संप्रदायाची उपासना करत माधुकरी मागून आपलं जीवन जगणारे हे विद्यार्थी वारकरी संप्रदायाचं वैभव आहेत. बोलले असतील एखादा शब्द म्हणजे त्यांना आरोपींप्रमाणं वागणूक देण़ हे 'सद्रक्षणाय ' चा विसर पडल्याचं लक्षण आहे. या दोघांच्या गोंधळात इतर समाज अनियंत्रित झाला व लोक पोलिसांनाही तुडवत पुढे गेल्यावर मग सुरु झाला लाठीचार्ज....! आणि शेकडो वर्षांपासून शांततेत पार पडत असलेल्या प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागले.
महाराष्ट्र शासनाकडून नियोजनाची कमतरता :-
गेल्या अनेक वर्षापासून आम्ही महाराष्ट्र शासनाकडे आषाढी यात्रेचे नियोजन कुंभमेळ्याच्या धरतीवरती करण्यात यावे व वारी पंधरा दिवसावर असताना नियोजन नको तर संप्रदायाप्रमाणे चैत्र महिन्यापासून या वारीचे नियोजन करायला हवे असा आग्रह धरत आहोत मात्र शासनाचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. व ऐनवेळी नियोजनशुन्य निर्णय घेण्यात येतात.किंवा प्रशासनाच्या हाती अमर्याद अधिकार दिले जातात. वास्तविक महाराष्ट्र शासनाकडून महसूल , आरोग्य व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांना 'वारकरी हिताला प्राधान्य ' अशा सक्त सूचना असायला हव्यात. वारकऱ्यांच्या सूचना काय आहेत त्याप्रमाणे प्रशासनाने वागले पाहिजे अशी सक्त ताकीद शासनाने घालून द्यायला हवी मात्र प्रशासकीय अधिकारी मनमानी पद्धतीने निर्णय घेतात वारकऱ्यांकडे वेळ कमी असतो आणि शासनाकडे दाद मागायची तोपर्यंत आषाढी वारी होऊन गेलेली असते. या प्रकारामुळे महाराष्ट्र शासन वारी हा विषय गांभीर्याने घेत नाही तोपर्यंत अशा गोष्टी घडत राहणार व याची जबाबदारी शासनाला टाळता येणार नाही.
राजकीय भांडवल :-
वारकऱ्यांवर लाठीचार्ज या नुसत्या बातमीने दोन वर्षांपूर्वी वारकऱ्यांच्या खांद्यावरची पताका काढून घेतल्यावर सुद्धा ब्र शब्द न काढणारे या गोष्टीचे भांडवल करत वारकऱ्यांचा कढ घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सरसावले. आमची सगळ्याच राजकीय पक्षांना विनंती आहे.कि वारकरी संप्रदाय त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे. प्रत्येक पक्षात वारकरी असतीलही पण वारकऱ्यांचा असा कोणताही पक्ष नाही. वारकऱ्यांचे दोनच पक्ष एक शुद्ध पक्ष व वद्य पक्ष (शुद्ध एकादशी व वद्य एकादशी) त्यामुळे यांचे राजकीय भांडवल कोणीही करु नये हि कळकळीची विनंती!
निष्कर्ष : -
ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा हा वारकऱ्यांचा आनंद सोहळा आहे व हा सोहळा एखाद्या वटवृक्षाप्रमाणे प्रतिवर्षी बहरत आहे.मात्र श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, व प्रशासन नियम, अटी, शर्थींचा कामापेक्षा जास्त अतिरेक करुन वटवृक्षा ऐवजी बोन्साय करण्याकडे कल ठेवून आनंद गोठवण्याचे काम करत असल्याची भावना अनेक जेष्ठ वारकरी, मानकरी, दिंडी मालक यांच्या मनात आहे. संस्थानने वारकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले तरच भविष्यात असे कटू प्रसंग टाळता येतील.
पोलिस प्रशासनाने हि केवळ आदेशाला बांधील न राहता 'सद्रक्षणाय' हि आपली जबाबदारी ओळखून वारकरी संप्रदायाविषयी भुमिका घेत असताना ती मिळमिळीत नसली तरी चालेल पण अतिरेकी नसावी याकडे कटाक्षाने लक्ष देत आपणही चुकू शकतो याचे आत्मपरीक्षण करायला हवे. ऐनवेळी घडणाऱ्या अशा गोष्टी मुळे कोणीही संतप्त होईल परंतू कितीही झाले तरी हे वारकरी आहेत, कुठलेही राजकीय आंदोलक नाहीत. त्यामुळे अमानुषपणे मारहाण करण्याचा कोणताही अधिकार पोलिसांना नाही .
विद्यार्थ्यांची चूक आहे त्यांनी झालेल्या निर्णयावर पोलिसांशी हुज्जत घालायला नको होती. तसेच थेट चर्चा करण्याऐवजी जेष्ठ महाराज मंडळींद्वारे संस्थानकडे प्रतिसाद मागायला हवा होता. किंवा शेवटी समाज आरतीवेळी नियमानुसार टाळ वाजवत तक्रार व्यक्त करायला हवी होती.... मात्र आदेशाच्या बांधील असणार्या पोलिसांशी अनाठायी वाद घालण्याची चुक भोवली.अशा चुका भविष्यात टाळायला हव्यात व वारकरी संप्रदायाकडे कोणी बोट दाखवेल असे नियमबाह्य वर्तन करु नये.
दोषी कोण ?
१) श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान :- दोषी क्रमांक १
२) महाराष्ट्र पोलीस : दोषी क्रमांक २
३) महाराष्ट्र शासन : दोषी क्रमांक ३
४) शिस्त मोडणारे वारकरी विद्यार्थी: दोषी क्रमांक ४
उपाय काय : -
१) श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने यासंदर्भात लेखी खुलासा करत समन्वयाअभावी घडलेल्या या प्रकारामुळे वारकऱ्यांना झालेला त्रास याबद्दल स्पष्ट दिलगीरी व्यक्त करायला हवी. व सर्वांना धाका ऐवजी प्रेमाने सोबत घेऊन काम केले पाहिजे. आपण तोंडावर पडावे यासाठी आपल्यातीलच काही लोक प्रयत्न करत आहेत का ? याचा संस्थानने आत्मशोध घ्यावा. सोहळा नियोजन साठी जगद्गुरु तुकोबाराय संस्थानचा आदर्श घ्यावा.
२) महाराष्ट्र पोलिसांनी हि नवनवे व्हिडिओ जारी करत बसण्यापेक्षा झालेला प्रकाराबद्दल बिनशर्त माफी मागितली पाहिजे. जर माफी मागण्याची तयारी नसेल तर लाठीचार्ज करणारे व त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या वर कारवाई व्हायला हवी. पोलिस दलात अनेक वारकरी व वारकरी संप्रदायावर श्रद्धा असणारे अधिकारी आहेत त्यांच्या कडे यापुढे विशेष जबाबदारी दिली पाहिजे.
३) महाराष्ट्र शासनाने केवळ विरोधक टिका करत आहेत म्हणून याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.तर याची सखोल चौकशी करुन कोणालाही पाठीशी न घालता कारवाई करण्याचे आश्वासन संप्रदायाला दिले पाहिजे.
४) वारकऱ्यांनीही आपली शेकडो वर्षांची सहिष्णू प्रतिमेला एखाद्या आतातायी वागण्याने गालबोट लागणार नाही ना ? याची प्राणपणाने काळजी घेतली पाहिजे.
ग्राऊंड रिपोर्ट कोणालाही दोषी ठरवण्यासाठी किंवा कोणालाही पाठीशी घालण्यासाठी तयार केलेला नसून वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून तळमळीपोटी कर्तव्य भावनेने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे....व्यक्तीगत कारणांमुळे व सटीक माहीती गोळा करण्याचे आव्हान यामुळे बराच विलंब झाला.या विलंबाबद्दल क्षमाप्रार्थी आहे! रिपोर्ट मध्ये काही चुकीचे वाटल्यास गैरसमज नसावा प्रत्यक्ष संवाद साधला तर आनंदच होईल!
पुढील सर्व सोहळा सुखरुप पार पडो याच शुभेच्छा!
रामकृष्ण हरि!
रामकृष्ण हनुमंत महाराज वीर
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
वारकरी संप्रदाय पाईक संघ.
संपर्क: ९१७५५९५४०५