पंढरपूर (प्रतिनिधी) - भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या सेवेमध्ये असणाऱ्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पुढील काळातील दीर्घकालीन विकासाभिमुख कामांची पूर्तता होण्यासाठी शेकडो कोटींचा निधी प्राप्त झाल्यामुळे मतदारसंघातील अनेक विकास कामांना गती आणि चालना मिळाली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला देशाचा कारभार हाती घेऊन नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने केलेल्या कामांची व योजनांची माहिती देण्यासाठी आ. आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. पुढे बोलताना आ आवताडे यांनी सांगितले की, मतदारसंघातील दळणवळण सुविधा सक्षम होण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या सहकार्याने या मंत्रालय मार्फत हजारो कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने मतदारसंघातील अनेक रस्ते चकाचक झाले आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या नागरी विकास विभागाअंतर्गत नगरपरिषद विकास कार्यक्रमांची पूर्तता होण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला आहे.
पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाच्या धोरणात्मक विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नऊशे कोटी रुपयांहून अधिकची कामे होत आहेत. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांवरून दोनशे खाटांचे करण्यासाठी तेरा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच पंढरपूर येथे एमआयडीसी स्थापन होण्यासाठी उच्चधिकारी समितीची मान्यता मिळाली असून सदर एमआयडीसी उभारणीची कार्यवाही लवकरच सुरु होण्याच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. त्याचबरोबर देवभूमी म्हणून सांप्रदायिक विचारांचा वसा आणि वारसा जतन करणाऱ्या पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या वारकरी भाविकांच्या भक्तीमय विचारसाधनेला भजन, कीर्तन, भारूड आदी माध्यमातून सादरीकरण करण्यासाठी नामसंकीर्तन सभागृह उभारणीसाठी तीस कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला आहे. पंढरपूर येथील यात्रा अनुदान दहा कोटी रुपये इतके वाढवण्यात आले आहे. पंढरपूर शहरातील नवीन पाणी योजनेसाठी ११० कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता मिळाली आहे. तसेच ड्रेनेजसाठीही नवीन १०५ कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे. शहरातील रस्त्यासाठी १०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे.
वाखरी ते पंढरपूर या पालखी मार्गाच्या कामासाठी दीडशे कोटी रुपयांचे काम मंजूर झाले असेल सरगम चौक ते शहरात येणाऱ्या उड्डाणपुलाचे ऑनलाइन भूमिपूजन नुकतेच पार पडल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले. मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांच्या उपसा सिंचन योजनालाही तांत्रिक मंजूरी मिळाली असून लवकर याचे काम सुरू होईल. त्याचबरोबर म्हैसाळ योजना समाविष्ट गावांच्या योजनेसाठी निधी मिळाला आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील मूलभूत आणि पायाभूत सुविधा कार्यान्वित होण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मार्फत विविध योजना मंजूर केल्या जात आहेत. संपूर्ण भारत देशातील वारकरी भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री विठ्ठल - रखुमाई मंदिराच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.