कल्याणराव काळे यांनी सहकार शिरोमणीची सत्ता राखली

0
वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन कल्याणराव काळेंची सत्ता कायम..

पंढरपूर (प्रतिनीधी) – संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अखेर सत्ताधारी कल्याणराव काळे यांच्या गटाने विजयाचा गुलाल उधळला. काळे यांच्या उमेदवारांनी पंधराशेहून अधिक मतांनी विजय मिळवताच अत्यंत उत्साही झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण करून हलगीच्या तालावर मोठा जल्लोष केला. 
तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी काळे यांच्या विरोधात विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, सहकार शिरोमणीचे माजी संचालक दीपक पवार व स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांनी दंड थोपटले होते. काळे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असल्याने त्यांनी विठ्ठलचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यासह युवराज पाटील, गणेश पाटील यांच्याशी हातमिळवणी केली होती. तसेच  ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी देखील काळे यांना पाठींबा दिला होता. यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. मागील पंधरा दिवसापासून दोन्ही गटाकडून एकमेकांवर मोठे आरोप प्रत्यारोप झाले. अखेर पर्यंत बाजी कोण मारणार याबाबत अंदाज लावणे अशक्य झाले होते. अखेर काळे यांनी अभिजीत पाटील यांच्या गटाचा 1500 ते 1700 मताच्या फरकाने पराभव करून कारखान्याची सत्ता अबाधित राखली.
{ विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे :-

भाळवणी गटातून : गोरख हरीबा जाधव (5569), युवराज छगन दगडे (5491), सुनिल वामन सराटे (5456), भंडीशेगाव गटातून : कल्याणराव वसंतराव काळे (5627), अमोल नवनाथ माने (5460), परमेश्वर हरिदास लामकाने (5441), गादेगाव गट : दिनकर नारायण कदम (5544), नागेश एकनाथ फाटे (5507), मोहन वसंतराव नागटिळक (5475), कासेगाव गटातून : योगेश दगडू ताड (5495), तानाजीराव उमराव सरदार (5416), जयसिंह बाळासाहेब देशमुख (5436), सरकोली गटातून : राजाराम खासेराव पाटील (5494), संतोषकुमार शिवाजी भोसले (5453), आण्णा गोरख शिंदे (5476), अनुसुचित जाती जमाती प्रतिनिधी : राजेंद्र भगवान शिंदे (5568), महिला राखीव प्रतिनिधी : संगीता सुरेश देठे (5521), उषाताई राजाराम माने (5383), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : अरुण नामदेव नलवडे (5543), भटक्या विमुक्त जाती जमाती : भारत सोपना कोळेकर (5661), संस्था मतदार संघातून मालन वसंतराव काळे (बिनविरोध) निवडणून आल्या आहेत.}

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)