पंढरपूर, दि. 16 (उ. मा. का.) : सोलापूर जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 23 जून तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 24 जून 2023 रोजी असून, अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. वारी कालावधीत पालखी तळ, मार्ग तसेच पंढरपूर शहरात वारकरी, भाविकांना अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरण युद्ध पातळीवर कार्यवाही करत आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी ही माहिती दिली.
अधीक्षक अभियंता संतोष सांगळे म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 8 व 9 जून 2023 रोजी पंढरपूर येथे आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये महावितरण कंपनीस खबरदारी म्हणुन आवश्यक सुचना देवून संबंधित अधिकाऱ्यांनी पालखी तळ, मार्ग तसेच पंढरपूर शहरात भाविकांना सुरक्षित व अखंडित विद्युत पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महावितरण कंपनीने मौजे खुडूस येथे होणाऱ्या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी तीन लघुदाब वीज खांबांचा अडथळा होत असल्याने सदरचे खांब स्थलांतरीत केले आहेत. मौजे माळखांबी येथील पालखीमार्ग रस्त्यामधील एक उच्चदाब वाहिनीचा खांब स्थलांतरीत केला आहे. मौजे तोंडले येथील लघुदाब वाहिनीचे दोन खांब व बोंडले येथील लघुदाब वाहिनीचे दोन खांब इतर ठिकाणी स्थलांतरीत केले आहेत.
तसेच, पंढरपूर शहर येथील महाद्वार घाट ते नामदेव पायरी मंदिर यात साधारण १ कि.मी. अंतरा दरम्यान असलेल्या ४३ विद्युत सर्व्हिस वायर रस्त्याचा एका बाजूने घेणे, पालखीतळ नातेपुते येथील पाच लघुदाब वाहिनीच्या गाळ्यांच्या उघड्या तारांऐवजी एबी केबल करणे, पालखीतळ, माळशिरस येथील २० गाळ्यांची लघुदाब वाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम प्रगतीपथावर असुन दोन दिवसांत सदरचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, असे श्री. सांगळे म्हणाले.
अधीक्षक अभियंता संतोष सांगळे म्हणाले, पालखी तळ, मार्ग तसेच पंढरपूर शहर येथील सर्व उपकेंद्रासाठी येणाऱ्या ३३ केव्ही व ११ केव्ही वाहिन्यांची पाहणी करण्यात आली असुन, वाहिनी मार्गात येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. सर्व गर्दीच्या ठिकाणचे विद्युत खांबांचे अर्थिंग तसेच पोलला पीव्हीसी पाईपचे कव्हर बसविले आहेत. विद्युत खांबांतील दोन पोल मधील अंतर नियमाप्रमाणे असल्याचे खात्री करून वाकलेले पोल सरळ करण्यात आले आहेत. सर्व रोहित्रांची व उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची प्रत्यक्ष पाहणी करून ऑईल पातळी तपासण्यात आली आहे. रोहित्रांच्या नादुरूस्त वितरण पेट्या दुरूस्त करण्यात आल्या असून, पालखी मार्गावरील येणा-या वारक-यांना, दिंडीमधील भाविकांना ट्रॅक्टरद्वारे विहिरीवरून पाणी भरण्यासाठी त्या विहिरींना तात्पुरते वीज कनेक्शन देण्यात आले आहे. वारी कालावधीत महावितरणचे जादा अधिकारी, अभियंते, तांत्रिक कर्मचारी अशा सुमारे २६३ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे