चेअरमन अभिजीत पाटील यांच्या विरोधात युवराज पाटील आक्रमक
पंढरपूर (प्रतिनीधी) - "मी सध्या वयाने आणि विचारानेही जाणकार आहे. मला राजकारणात दुसऱ्याच्या सांगण्यावरून कुठे राहावे, ही सांगण्याची अजिबात गरज नाही. केवळ या निवडणुकीत राजकारण दाखविण्यासाठी काहीजण निवडणूक लढवीत आहेत. यामुळे त्यांना रोखण्यासाठी मी काळे यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. तरी सभासदांनीही आता साखर कारखाने भाड्याने घेऊन मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्याच्या पाठीमागे भरकटत न जाता. कारखाना उभारणी करणाऱ्या काळे यांच्याच पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन विठ्ठल परिवाराचे नेते युवराज पाटील यांनी केले आहे."
विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी वसंतदादा शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार प्रचारासाठी कौठळी येथे आयोजित बैठकीत युवराज पाटील यांनी वरील आवाहन केले आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना युवराज पाटील म्हणाले की, पंढरपूर तालुक्यातील राजकारणाची संस्कृती बिघडविण्याचे काम काही जण पैसेच्या जोरावर करीत आहे. यामुळे आताच आशा प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहे.
विठ्ठल वर लोकांनी तुमच्या हातात सत्ता दिली आहे. त्यावर पाच वर्ष नीट कारभार करून दाखवा. एखादा कारखाना आपण नवीन उभारला असता तर त्यासाठी लागणाऱ्या यातना समजल्या असत्या. केवळ आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याची चटक लागल्याने या निवडणुकीत ते उतरले आहेत. मात्र हा सहकार शिरोमणीचा सभासद तुमच्या सवयीला आता बाजूला सरल्याशिवाय राहणार नाही असेही युवराज पाटील यांनी सांगितले आहे.
राजकारण करीत असताना पूर्वीपासून या तालुक्यातील अनेक नेतेमंडळीमधे तत्व सोडली जात नव्हती. परंतु यांनी आता चुकीच्या अपप्रचार करीत लोकांना दिशाभूल करायचं अन् कारखाना घ्यायचा हा उद्योग सुरू केला आहे. आशा या प्रवृत्तीचा शिरकाव होऊ नये याची काळजी या निवडणुकीत नक्की पहावयास मिळणार असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले.
शुक्रवारी दिवसभर शेवते, करकांब, उंबरे, कान्हापुरी, कारोळे, भोसे, पळशी आणि शेवटची बैठक कौठळी येथे पार पडली. यावेळी सभासद यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. वरील बैठकीत चेअरमन कल्याणराव काळे, सुधाकर कवडे, साईंनाथभाऊ अभंगराव, विठ्ठलचे संचालक समाधान काळे, विठ्ठलचे कामगार रामचंद्र भुसणर, शेतकरी संघटनेचे नेते नितीन बागल, समाधान फाटे, ज्ञानेश्वर जवळेकर, गादेगावचे रामभाऊ बागल यांच्यासह अनेक नेते मंडळी यांनी भाषणे करीत काळे यांना साथ देण्याचे आवाहन केले.
देगाव येथेच परिचारक कसे चालले - सुधाकर कवडे
या सहकार शिरोमणीचे निवडणुकीत परिचारक याची साथ आहे. असे म्हणत विठ्ठल परिवाराची दिशाभूल करण्याचे काम चेअरमन अभिजीत पाटील यांचेकडून केले जात आहे. मात्र आपल्या स्वतःच्या देगाव येथील ग्रामपंचायत मध्ये काय करून ठेवलं आहे. सदस्य तुमचं अन् सरपंच परिचारक गटाचा. तुम्हाला चालत अन् आपणच निवडणुकीत खोटं बोलता. यामुळे त्यांनी आता लबाडीची हद्द ओलांडली असल्याचे संचालक सुधाकर कवडे यांनी सांगितले. अभिजीत पाटील यांनी ज्या ज्या गावात सभा घेतल्या त्या ठिकाणी शुटिग काढून बघा, प्रत्यक्षात सभासद मतदार किती आणि मोकाट गर्दी किती, यावरून या निवडणुकीतील निकाल आताच स्पष्टपणे दिसू लागला आहे.