धर्मपुरी येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले पालखीचे स्वागत
पंढरपूर दि. २३ (उ.मा.का.) :- आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.
धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू रजणीश कामत, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
पालकमंत्र्यांनी केले सारथ्य
धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माऊलीच्या रथाचे सारथ्य केले. रथामध्ये त्यांच्या समवेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,आमदार जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते. पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर पालखी विसावा ठिकाणापर्यंत चालण्याचा आनंद लुटला