पंढरपूर (प्रतिनिधी) दि.10 :- केंद्र शासनाच्या सहकार विभागाकडून सहकारी साखर कारखान्यांना पुनर्जिवित करण्याकरीता एनसीडीसी मार्फत मार्जीन मनी लोन मिळण्याकरीता राज्यातील 14 कारखान्याचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कारखान्यास एनसीडीसीकडून 150.00 कोटी कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
केंद्र सरकारच्या सहकार विभागामार्फत सुरुवातीस राज्यातील 9 कारखान्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) मार्फत कर्ज उपलब्ध् करुन देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये राज्यातील भारतीय जनता पार्टी व शिवसेना गटाच्या कर्मयोगी (इंदापूर), निराभीमा (बावडा), शंकर (सदाशिवनगर), भिमा (टाकळी सिकंदर) वैद्यनाथ (परळी), प्रवरा (अहमदनगर) गणेश (अहमदनगर), रामेश्वर (जालना) या कारखान्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला होता.
केंद्र सरकारच्या या धोरणामुळे आजारी कारखान्यांना उर्जीतावस्था निर्माण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्र सरकारने देशभरातील तोट्यात चालणाऱ्या कारखान्यासाठी मार्जीन मनी लोन योजनेसाठी विशिष्ट् कारखान्याचे प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार सरकारशी संबंधित कारखानदारांना सहकार्य करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय होता. त्यानुसार राज्यातील या कारखानदारांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील कल्याणराव काळे चेअरमन असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचाही कर्जासाठी प्रस्ताव मागविण्यात आलेला होता. महाराष्ट्रातील पाच कारखान्याचे नव्याने फेर प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामुध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्या व्यतीरिक्त् छत्रपती (भवानीनगर,) जयभवानी (गेवराई) रावसाहेब दादा पवार (घोडगंगा), आगस्ती (नगर), या कारखान्यांचाही फेर प्रस्तावामध्ये समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाचे सहकार विभागाचे रुटथ्रु मार्जीन मनी लोन यादीमध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा समावेश केल्यामुळे आज पर्यंत आलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.