अज्ञातांकडून २२ एटीएम मशीनमधून पैसे काढल्याचा प्रकार
शहर पोलिसांत गुन्हा दाखल
पंढरपूर : (प्रतिनिधी) - येथील पंढरपूर अर्बन बँकेच्या २२ एटीएम मशीनमधून ६६८ एटीएम कार्डच्या माध्यमातून तीन कोटी तीन हजार २०० रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार - उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात राजेश औदुंबर आगावणे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पंढरपूर अर्बन बँकेच्या पंढरपूर शहरासह इतर जिल्ह्यांमध्ये शाखा आहेत. १५ मार्च २०२३ ते १९ मे या कालावधीत २२ एटीएम मशीनमध्ये अज्ञातांकडून छेडछाड करण्यात आली आहे. एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून ६६८ एटीएम कार्ड वापरण्यात आले आहेत. यामध्ये त्या अज्ञाताने स्वतःचे किंवा इतर एटीएम कार्डचा वापर केला आहे.
सदर झालेल्या प्रकारात आपले बँकेचे कोणत्याही ठेवीदार/सभासद/ग्राहक खातेदारचे खात्यातील रक्कम गेलेली नाही व खातेदाराचे नुकसान झालेले नाही.
या प्रकरणात पंढरपुर अर्बन बँकेचे एकही एटीएम कार्ड वापरण्यात आले नाही. सर्व ६६८ एटीएम इतर बँकांचे आहेत.
हा एक तांत्रिक चोरीचा प्रकार आहे आणि याबाबत बँकेचे Insurance policy उपलब्ध आहे.
झालेला प्रकार लक्ष्यात येताच बँकेने या संदर्भात पोलीस खात्यामध्ये रीतसर तक्रार नोंदवली आहे व यामध्ये उच्चस्तरिय चौकशी व्हावी या साठी बँक व्यवस्थापन व संचालक प्रयत्नशील आहेत.
या प्रकारामुळे पंढरपुरातील बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. बँकांमधील सुरक्षितता धोक्यात आल्याने खातेधारक धास्तावले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक अरुण फुगे तपास करीत आहेत.