पंढरपूर (प्रतिनिधी) - राज्याच्या राजकारणात भारत राष्ट्र समिती वेगाने पुढे येत आहे. अनेक पक्षाचे मातब्बर नेते, माजी आमदार यांची बीआरएसमध्ये प्रवेश देत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. सुरुवातीला मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केलेल्या केसीआर यांनी आता हळूहळू राज्याच्या विविध कोपऱ्यात पाय रोवण्याची तयारी केली आहे. त्यात पंढरपूर आषाढी वारीनिमित्त केसीआर जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जातेय.
येत्या २७ जून रोजी तेलंगणाचे सर्व मंत्रिमंडळ घेऊन मुख्यमंत्री केसीआर हे पंढरपुरच्या पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. अब की बार किसान सरकार हा नारा देत केसीआर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना हाक दिली आहे. पंढरपुरात मोठ्या संख्येने वारकरी आषाढी वारीनिमित्त एकत्र येतात. याच संधीचा फायदा घेत केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीने पंढरपुरात शक्तीप्रदर्शन करण्याचं ठरवले आहे. तब्बल ३०० वाहनांचा ताफा घेऊन केसीआर पंढरपुरात दाखल होतील. त्यानंतर त्यांच्याकडून माऊली ज्ञानोबा, संत तुकाराम महाराजांच्या पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.