जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

0


नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला

पालकमंत्री राधाकृष्ण विख-पाटील यांनी केले पालखीचे स्वागत


       पंढरपूर दि. 24 (उमाका) :-  चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी...असा हरी नामाचा गजर करीत 'भक्ती रसात'  चिंब न्हाहून गेलेल्या जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले.


गद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.


हाती दिंड्या पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हा-ताणाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहे.

नीरा नदी ओलांडून श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.३० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

पालकमंत्र्यांनी केले सारथ्य 

पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचे सारथ्य पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.  यावेळी रथात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते.

पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली.  यावेळी त्यांच्या हस्ते भाविकांना ओआरएस पाकिटाचे वितरण करण्यात आले.  तद्नंतर गळ्यात वीणा घेऊन पालकमंत्री श्री. विखे पाटील पालखी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी वारकरी भविकासमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

नगरपरिषदेच्यावतीने पालखीचे स्वागत

 अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगरपरिषदेच्यावतीने जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत केले.

नेत्रदीपक रिंगण सोहळा

जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात  झाले.  पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन  केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले. अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली. भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा  याची देही याची डोळा अनुभवता आला. डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व  आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)