वारकरी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून पालखीतळ, पालखी मार्गाची पाहणी

0
पंढरपूर, दि. ३ (उ. मा. का.) : संतश्रेष्ठ श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज आणि अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालखी तळ व मार्गावरील तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या.
      संतश्रेष्ठ श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गाची व विविध पालखीतळांची पाहणी प्र. जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांनी आज  केली.
     यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, विनायक गुळवे, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता अमित निमकर, उपकार्यकारी अभियंता ज्योती इंगवले तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
         यावेळी जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे म्हणाले, जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 23 जून तर जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 24 जून 2023 रोजी होणार आहे. पालखी सोहळ्या सोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना  पालखीतळावर तसेच विसाव्याच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य, प्रखर प्रकाश व्यवस्था, पालखीतळावरील मुरूमीकरण, पालखी व विसावा कट्ट्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासनातील सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. लाखो वारकऱ्यांचा चैतन्यदायी सोहळा म्हणजे रिंगण सोहळा या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होते या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी तळाशेजारची अपुरी असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. पालखी सोहळ्याच्या प्रताप परंपरेचे जतन करण्यासाठी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करावीत अशा सूचनाही प्र. जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांनी दिल्या.
       माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी, नातेपुते, माळशिरस, तोंडले  बोंडले, बोरगाव, माळीनगर तसेच पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली भंडीशेगांव, वाखरी पालखीतळ, रिंगण सोहळ्याची ठिकाणी तसेच 65 एकर व नदी पात्राची प्र. जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधितांना यावेळी दिल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)