पिकअप सह नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

विदेशी दारूच्या पेट्या जप्त

   पंढरपूर  (प्रतिनिधी) -  पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने बुधवारी (ता. 21) वाखरी गावाच्या हद्दीत एका पिकअप वाहनातून दीड लाखांची गोवा राज्य निर्मित विदेशी दारु जप्त केली.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाचे निरिक्षक किरण बिरादार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वाखरी (ता. पंढरपूर) गावाच्या हद्दीत वाखरी-गादेगाव रोडवर सापळा रचून एका वापरत्या अशोक लेलॅंड कंपनीच्या चारचाकी पिकअप वाहन क्र MH 42 BF 2671 चा पाठलाग केला असता वाहनचालक गाडी सोडून फरार झाला. निरिक्षक पंढरपूर यांनी सदर वाहनाची झडती घेतली असता जनावराच्या चाऱ्याआड विदेशी दारूच्या पेट्या लपवून ठेवल्याचे दिसून आले. वाहनात 25 कागदी बॊक्समध्ये गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेल्या एड्रीयल क्लासिक व्हिस्कीच्या 750 मिलीच्या 300 सीलबंद बाटल्या आढळून आल्याने महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्यात एक लाख छप्पन हजार किंमतीची दारु व पिकअप वाहन असा एकूण नऊ लाख सहा हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक किरण बिरादार, सहायक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, जवान गणेश रोडे, गजानन ढब्बे व वाहनचालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली.

*आवाहन*
आषाढ़ी वारीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारु विक्री, निर्मिती, वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)