पंढरपुरात 28 पासून कृषी प्रदर्शन व तृणधान्य महोत्सवास प्रारंभ
सोलापूर, दि. 24 (जि. मा. का.) - आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये दिनांक 28 ते 30 जून 2023 या कालावधीत भव्य कृषि प्रदर्शन व तृणधान्य महोत्सवाचे आयोजन कृषि विभाग व आत्मा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. तरी सर्व शेतक-यांनी या कृषि प्रदर्शन व तृणधान्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
कृषि प्रदर्शनास भेट देणा-या शेतक-यांना शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती, कृषि क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके पाहता येतील. तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून भव्य पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करुन पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व व जाणीव जागृती करण्याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे.