आंतरराष्ट्रीय योग दिन

0

केवळ आसन किंवा प्राणायाम यांनाच बर्‍याच वेळेला आपण योग समजत असतो. मात्र, तसे नसून योगाची व्याप्ती खूप मोठी आहे. ‘युज्’ या मूळ संस्कृत धातूपासून तयार झालेल्या योग या शब्दाचा अर्थ जोडणे’ असा होतो. आपलं शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणे याला योग म्हणतात. योग ही सर्वांगीण आरोग्यपूर्ण जीवनशैली आहे असे म्हणायला हरकत नाही. भगवद्गीतेनुसार योगाची ही परंपरा अनादी अशी आहे. योगाचे उद्गाते भगवान श्रीशंकर असून त्यांनी पहिल्यांदा पत्नी पार्वतीला योग सांगितल्याचे उल्लेख पुराणात आढळतात.
संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. याच दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय योग दिन देशभर सर्व शैक्षणिक आणि शासकीय कार्यालयांमध्ये व जगभर साजरा होत आहे. जवळपास पाच हजार वर्षांहून अधिक मोठी परंपरा असणारी ‘योगविद्या’ ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.
आचार्य पतंजलींनी योगाची व्याख्या करताना ‘योग: स चित्तवृत्तीनिरोध:’ अशी केली आहे. याचा अर्थ मनाला स्थिर करणे म्हणजे योग. ‘समत्वं योगमुच्यते ।’ असे भगवद्गीता सांगते. सिद्धी आणि असिद्धी या दोहोंबाबत समान दृष्टी ठेवून कर्म करत राहणे म्हणजे योग. याशिवाय ‘योगः कर्मसु कौशलम्।’ असेही भगवान श्रीकृष्ण म्हणतात. कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग, हठयोग असे विविध योगमार्ग दिसून येतात. योग ही अशी निरंतर प्रक्रिया आहे जी कायिक, वाचिक आणि मानसिक या तीनही पातळींवर स्थैर्य प्रदान करून माणसाला सर्वार्थाने निरोगी ठेवते. निरोगी राहण्यासाठी योग हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अंग बनायला हवे.
आयुर्वेदाप्रमाणे योगाची देखील आठ अंगे आहेत. यम, नियम, आसन आणि प्राणायाम हे बाह्य अंगे शरीराकडे अधिक लक्ष देतात, तर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे आंतर अंगे आहेत. योग, मन आणि आत्मा यांच्या पातळीवर कार्य करून साधकाला मोक्षाप्रत पोहोचवतात. आसने आणि प्राणायाम यापुरतेच योगाला मर्यादित ठेवणे हे अयोग्य आहे. योगशास्त्र मानवी जीवनाला हिर्‍याप्रमाणे पैलू पाडून लौकिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही पातळीवर त्याला अनमोल बनवते. म्हणून प्रत्येकाने योगाभ्यासक बनायला हवे. ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ हा केवळ एका दिवसापुरता साजरा करण्याचा दिवस न राहता आपल्या सगळ्यांची दैनंदिन योगाकडे वाटचाल घडवणारा ठरायला हवा.
दररोज योगासने, प्राणायाम आणि ध्यान केल्याने हृदय एकदम तंदुरुस्त बनते. काही जणांनी तर वयाच्या 72 व्या वर्षी योग करणे सुरू केले आणि आज 80 च्या पुढे वय असूनही एवढे ते तंदुरुस्त आहेत की स्वतः योगाची शिबिरे घेतात. म्हणजे योग करण्यास वयाचे बंधन नाही. चांगल्या आरोग्यासाठी त्यांचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे.
  आपल्याच आरोग्याचे रक्षण करणारी जीवनपद्धती म्हणूनच योगसाधनेकडे पाहिले पाहिजे, हे या निमित्ताने सांगावेसे वाटते. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)