जिजामाता यांचे कार्य महाराष्ट्राला जोडण्याचे - धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज

0
नामदेवगाथाव्रती प्रकाश निकते गुरुजी यांना जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार प्रदान

पंढरपूर : विदर्भापासून ते कोकणापर्यंत महाराष्ट्राला एका धाग्यात जोडण्याचे कार्य राजमाता जिजाऊ यांनी केल्याचे प्रतिपादन धर्मभास्कर प पू सद्गुरुदास महाराज यांनी केले. छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर-पुणे च्या वतीने दिला जाणारा ४० वा "जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार" यंदा सुविख्यात नामदेवगाथाव्रती प्रकाश निकते गुरुजी (पंढरपूर) यांना श्रीशनेश्वर धाम, पंढरपूर येथे समारंभपुर्वक प्रदान करण्यात आला.  यावेळी उपस्थितांना आशीर्वचन देताना सद्गुरुदास महाराज बोलत होते.

यावेळी मंचावर प. पू. अमृताश्रम स्वामी,  प्रकाश निकते, सौ. प्रतिभा निकते, प पू सद्गुरुदास महाराज, संजय देशकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह , मानपत्र आणि रोख ५१ हजार असे प्रदान करण्यात आलेल्या  पुरस्काराचे स्वरूप आहे.

 श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५०वे  वर्ष आज पासून सुरु होत असल्याचे सांगत सद्गुरुदास महाराज यांनी अत्यंत पावन आणि शुभ दिनी या  सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. संपूर्ण जीवन नामदेवगाथेचा प्रचार प्रसार करून  निस्वार्थपणे कार्य करण्यासाठी जिजाऊ यांचा आशीर्वाद आणि प्रसाद श्री प्रकाश निकते गुरुजी यांना प्राप्त झाल्याचे महाराज म्हणाले. संसार नव्हे संसाराची आसक्ती सोडा नामदेव महाराज यांच्या सारखा संसार करा, प्रकाशराव निकते यांनी असाच आदर्श संसार केला म्हणून त्यांचा सत्कार.

अध्यक्षस्थानी असलेले  प. पू.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (बीड) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की जिजाऊ यांचे माहेर विदर्भाचे आणि रुक्मिणी मातेचे माहेर देखील विदर्भाचे या संदर्भाने माहेरचा प्रसाद पंढरपूरच्या प्रकाश निकते गुरुजी यांना मिळाला आहे. नामदेवांच्या भक्ताला माझ्या माहेरचा आहेर मिळतोय याबद्दल रुक्मिणी मातेला देखील आनंद होत असेल अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. निकते गुरुजी यांच्या कार्याचे कौतुक आणि सन्मान करीत आचार्य अमृताश्रम स्वामी यांनी त्यांना अनेक आशीर्वाद दिले.

आज पर्यंतच्या नामदेव अभंगवाणी लोकांपर्यंत पोचविण्याचा कार्याला हा पुरस्काररूपी आशीर्वाद मिळाल्याचे मनोगत प्रकाश निकते गुरुजी यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर व्यक्त केले. छत्रपती सेवा प्रतिष्ठान तर्फे पंढरपूर शहराला प्राप्त हा वाङ्मयीन प्रसाद असल्याचे गौरव उद्गार देखील त्यांनी काढले. कोणी सोबत असो अथवा नसो नेटाने नि:स्वार्थ बुद्धीने सेवा करीत रहावे असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला..

तत्पूर्वी प्रकाश निकते गुरुजी यांचा परिचय नाशिकच्या नंदन राहणे यांनी करून दिला तर मानपत्राचे वाचन प्रसन्न बारलिंगे यांनी केले. दरम्यानच्या काळात 'सदा स्मरावे जिजाऊ नाम' या गीताची प्रस्तुती अजय देवगावकर आणि चमूने दिली. सुरवातीला 'जय शारदे वागेश्वरी' गीताचे  गायन सौ. जुईली काकडे व मनाली केकडे यांनी केले. छत्रपती सेवा प्रतिष्ठान प्रास्ताविक प्रा. संजय देशकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बरबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसन्न बारलिंगे यांनी केले.  कार्यक्रमाचा शेवट अजय देवगावकर प्रस्तुत श्री छत्रपती शिवाजी महाराज आरती ने झाला. पंढरपूर चे तसेच गुरू मंदिर परिवाराचे भक्त , श्रोते बहु संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)