श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या कर्मचाऱ्यांना महागाई व घरभाडे भत्ता योजना मंजूर
पंढरपूर (प्रतिनिधी) - भारताची दक्षिण काशी असणाऱ्या पंढरीतील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सन २०२३-२४ या वित्तीय वर्षी सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई व घरभाडे भत्ता देणेबाबत आदेश पारित करण्यात आले आहेत. सदर आदेशाचे पत्र श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाले आहे. श्रीविठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई व घरभाडे भत्ता देण्यासंदर्भात पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सदर बाबींसाठी अतिरिक्त खर्च म्हणून अर्थिक तरतूद करण्याची मागणी लावून झालेली होती. आ आवताडे यांच्या सदर मागणीचा शासनदरबारी विचार होऊन हे भत्ते मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
सदर भत्त्यांची मागणी करताना आ आवताडे यांनी सांगितले होते की, गेली अनेक वर्षे मंदिरे समितीचे कर्मचारी अगदी तुटपुंज्या वेतनावर काम करुन आपली कौटुंबिक चरितार्थ भागवत आहेत. परंतु कुटुंबाच्या वाढत्या गरजा व मुलांची शिक्षण आधी जबाबदारींच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांचे अर्थिक बजेट कोलमडून जात आहे. त्यामुळे त्यांना फार मोठ्या आर्थिक विवांचनेला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक स्वरूपातील या कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुरळीतपणे करण्यासाठी त्यांना महागाई व घरभाडे भत्ता मिळवून देण्यासाठी आ आवताडे यांनी वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व राज्याचे महसूल मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे आपला पाठपुरावा सुरू ठेवला होता. मंदिरे समितीमधील कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी अखेर ही महागाई व घरभाडे भत्ते देण्याचे शासनाने मंजूर केले आहे.
पंढरपूर व संपूर्ण भारत देशातील लाखो श्री.विठ्ठल-रखुमाई भक्तांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या या कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांची ही मागणी आ. आवताडे यांच्या प्रयत्नांतून पूर्णत्वास गेल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. लाभार्थी सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार समाधान आवताडे व राज्य शासनाचे विशेष अभिनंदन केले आहे.