मंदिर समितीवर नवे गडी घ्या ! -गणेश अंकुशराव

0
 
शहरातील नागरिकांना संधी द्या !!

वयोवृध्दांसाठी व पंढरपूरकरांसाठी स्वतंत्र दर्शनरांग असावी -गणेश अंकुशराव

पंढरपुर (प्रतिनिधी) : राज्यातलं शासन दोनवेळा बदललं परंतु पंढरपूर येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर नव्या सदस्यांची नियुक्ती अजुन केली गेली नाही. त्यामुळे मंदिर समितीचा कारभार काही अंशी ढिसाळ चालु असल्याचं प्रकर्षाने जाणवतंय. त्यामध्ये लाडू प्रसादाला पॅकिंग नसणं, दर्शन बारीमधील भाविकांना  विविध समस्यांना सामोरं जायला लागणं, ऑनलाईन पासेस मध्ये घोटाळा असल्याची सध्या सुरु असलेली चर्चा अशा अनेक बाबींचा समावेश करता येईल. मुळात जुन्या सदस्यांच्या नाकर्तेपणामुळेच मंदिर समिती प्रशासनाला योग्य ‘दिशा’ मिळाली नसल्याने आत्ता शासनाने नवी मंदिर समिती सदस्यांची बॉडी निवडताना त्यामध्ये जुन्यातील एकही चेहरा घ्यायला नकोय, पंढरपूर मधील कांही जबाबदार नागरिकांना मंदिर समितीमध्ये समाविष्ट करावं जेणेकरुन पंढरपूर शहरात आलेल्या भाविकांना नेमक्या कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? याचा अभ्यास हा फक्त स्थानिक नागरिकांनाच असतो. असे मत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
 
सध्याचे मंदिर समितीवरील सदस्य फक्त, ‘‘हे माझे पाव्हणे, हे आमचे रिलेटीव्ह आहेत, पक्षाचे आहेत वगैरे कारणं देत अनेकांना फक्त शॉर्ट कटने दर्शनाला सोडायचा धंदा करतात. मंदिर समितीच्या भक्त निवासामध्ये यांच्या नातेवाईकांसाठी स्पेशल रुम कायम रिझर्व्ह असतात. याव्यतिरिक्त यांना कांही काम नाही का? असा सवाल उपस्थित करत भक्त निवासाचं आणि व्हीआयपी दर्शनाची रजिस्टरंच शासनाने योग्य त्या अधिकार्‍यांकडून तपासून यामध्ये मंदिर समितीच्या विद्यमान सदस्यांच्या किती आणि कशा कशा शिफारशी आहेत ते एकदा तपासून घ्यावे आणि सध्याची समिती तातडीने बरखास्त करा आणि पुन्हा यांना बॉडीवर घेऊ नका. याचबरोबर सरसकट सर्वच वयोवृध्दांना जसा शासनाने एस.टी. पास मोफत केला त्याप्रमाणेच त्यांना विठ्ठलाच्या थेट दर्शनासाठी स्वतंत्र सुविधा द्यावी. तसेच पंढरपूर शहरातील भाविक भक्तांसाठीही स्वतंत्र दर्शन रांग असावी. अशी विनंती अंकुशराव यांनी शासनाला केली आहे.
 
आजतागायत समितीचा कोणताही सदस्य दर्शन बारीत फिरुन भाविकांची विचारपुस करताना कधी आढळलेला नाही, महाप्रसादाच्या ठिकाणी जाऊन कधीच कोणत्या सदस्याने तेथील सुविधांची माहिती घेतलेली नाही, मंदिरातील स्वच्छतेबाबतही यांनी कधीच काही पहाणी वगैरे केलेली आढळून आलेली नाही, कर्मचार्‍यांवर यांचा वचक नाही, मग यांना नेमके सदस्य म्हणून कशासाठी नियुक्त केले आहे? हा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळे शासनाने वारकर्‍यांच्या सर्वांगीन सोयी-सुविधांचा विचार करणारे, त्यासाठी पंढरपूरात जातीने हजर राहून अहोरात्रं झटणारे सदस्य समितीवर नेमावेत. फक्त आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी शासनाने धार्मिक स्थळांचा तरी वापर करु नये. असं आवाहन गणेश अंकुशराव यांनी केलंय.   

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)