चंद्रभागा नदीपात्रातून काढला 48 टन कचरा - मुख्याधिकारी अरविंद माळी
पंढरपूर : (दि.14) - आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. येणारे भाविक प्रथमत: चंद्रभागा स्नान करून श्रीविठ्ठल - रुक्मिणी पद दर्शन, कळस दर्शन तसेच नगर प्रदक्षिणेला प्राधान्य देतात. पवित्र स्नान करताना भाविकांना पाण्यात टाकण्यात आलेल्या निर्माल्य, फाटकी कपडे, कचरा याचा त्रास होऊ नये. तसेच नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहावे, यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहिम सुरु केली असून, यापूर्वी चंद्रभागा नदीपात्रातून 32 टन तर आज 14 जून रोजी 16 टन असा एकूण 48 टन कचरा काढण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.
चंद्रभागा नदी पात्रातील पाणी पातळी कमी होत असून, पात्रात टाकण्यात आलेले निर्माल्य , कपडे, कचरा नदीपात्रात दिसून येत असल्याने नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर जेसीबी, डंपरच्या सहाय्याने नदी पात्रातील निर्माल्य बाहेर काढले जात आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द आसलेल्या पंढरीत येत्या 29 जून रोजी आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याकरीता सुमारे 12 ते 15 लाख भाविक येतात. भाविकांना पंढरपुरात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन व प्रशासनाकडून कामे सुरू आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी 8 व 9 जून 2023 रोजी पालखी मार्ग तसेच पंढरपूरला येथे भेट दिली. यावेळी आयोजित बैठकीत चंद्रभागा नदीपात्रात स्वच्छता ठेवण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार चंद्रभागा नदीपात्रात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. बुधवार दि. 14 रोजी नगरपालिकेचे 40 कर्मचारी स्वच्छता मोहिम राबवत आहेत. यात आणखी वाढ करुन दररोज 100 कर्मचार्यांव्दारे यात्रा कालावधीपर्यंत स्वच्छता मोहिम सुरु ठेवण्यात येणार आहे.
सद्या विष्णुपद बंधारा (गोपाळपूर) येथील बंधऱ्यातील पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे आपसुकच पुंडलिक मंदिर परिसरातील चंद्रभागा नदीपात्रातील पाणी देखील कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पाण्यात टाकण्यात आलेली , तसेच वाहत आलेली फाटकी कपडे, निर्माल्य, प्लास्टीक आदी गोळा करण्याचे काम नगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. गोळा करण्यात आलेले निर्माल्य जेसीबी व डंपरच्या सहाय्याने नदीपात्रातून बाहेर काढले जात आहे.
त्याचबरोबर नदीपात्रात जलप्रदुषण होऊ नये यासाठी मोकाट गायी, म्हैस आदी प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात येत असून, नदीपात्रात धुतल्या जाणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. नदीपात्रात स्नान करताना भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तसेच नदीपात्र स्वच्छ राहील याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. यासाठी नदीपात्रात पथकांची नेमणूक केली असल्याचेही मुख्याधिकारी माळी यांनी सांगितले.