पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीची मंडल रेल प्रबंधक यांच्याकडे मागणी
पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो तर वर्षाकाठी कोट्यावधी भाविक महाराष्ट्रासह इतर राज्यातून येत असतात. हे भाविक पंढरीकडे येत असताना खाजगी वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वाच्या पैसे आकारून दररोज लूट सुरू आहे. ती लूट पाहता रेल्वे विभागाच्या विविध भागातून (नांदेड, नाशिक, शिर्डी, नागपूर, मुंबई, संभाजीनगर, कर्नाटक, कोल्हापूर) अशा अनेक भागातून रेल्वे सुरळीत करून त्याच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सुर्यवंशी यांनी मंडल रेल प्रबंधक सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. या निवेदनाची प्रत महाप्रबंधक सेंट्रेल रेल्वे मुंबई यांना पाठविण्यात आली आहे.
यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, जिल्हा सचिव राजू उराडे, युवक शहराध्यक्ष संदिप शिंदे, सेवादल अध्यक्ष गणेश माने, नागनाथ अधटराव, शशिकांत चंदनशिवे, कैलास लोकरे, पांडुरंग इरकल, सुदिप पवार, शिवकुमार भावलेकर यांच्यासह कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे विभागामार्फत पंढरपूर येथील रेल्वे स्टेशनला ज्या काही रेल्वे सुरू झाल्या होत्या त्या सध्या बंद आहेत त्या रेल्वे विभागाकडून पुर्ववत सुरू कराव्यात जेणेकरून वारकरी, शेतकरी, व्यापारी, श्रमिक, वृध्द, महिला यांची प्रवासी वाहनांकडून लूट थांबेल व पंढरपूर तिर्थक्षेत्र अजून मोठे होण्यास मदत होणार आहे. तरी सदरच्या मागण्यांचा तात्काळ विचार करून रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे.