पंढरपूर (प्रतिनिधी) - छत्रपती संभाजीराजे यांचे हाल करून त्याचा जीव घेणाऱ्या शत्रूचे जर कोणी उदात्तीकरण करीत असेल, अशा धर्मांध लोकांपुढे डोके झुकवित असेल तर अशा नेत्यांना आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी शिवतीर्थ येथे, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक ३५० व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित, नारदीय कीर्तन , सादर करीत असताना बुधवार दिनांक ७ जून रोजी सायंकाळी केले.
रा. स्व. संघ यांच्या वतीने आयोजित या कीर्तनात आफळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याविषयी असणारी व्यापक दूरदृष्टी, धैर्य, त्याग, संयमी वृत्ती , जिजाऊ मा साहेबांचे कर्तुत्व, आदर्श शिकवण याविषयी सुंदर विवेचन केले. दुटप्पी राजकारण करणाऱ्या लोकांनी छत्रपती शिवाजी यांचे नाव वापरून राजकारण करू नये,
प्रत्येक पक्षाचा नेता कोणावर भाषण करतो, त्यांचे आदर्श काय हे ठरवून निवडणुकीत मतदान करावे,
आगामी काळात विलक्षण राज्यक्रांती होणार आहे, हिंदुत्ववादी शासन घालविण्यासाठी मोठे कट, कारस्थाने रचली जात आहेत, आपण जरी ती हाणून पाडली, तरी निराश आणि पराभूत झालेला शत्रू जास्त हिंसा करतो, शत्रूच्या भयानक हल्ल्याला तोंड देण्यासाठी आपण कोणत्याही परिस्थीतिचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज कायम प्रतिकूल परिस्थितीत काय करायचे याचा विचार करून प्रत्येक मोहीम आखायचे असे त्यांनी सांगितले.
यावेळी रा. स्व. संघाचे तालुका कार्यवाह योगेश कुलकर्णी, जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.राजेश दंडे , सहप्रमुख प्रा. संदीप सावेकर, सुजित दिवाण, परमेश्वर जमदाडे, तेजस पाटील, सुधाकर जोशी, सारंग बदोडकर आदी मान्यवर उपस्थित होते, कीर्तनाची सांगता स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर रचीत शिवरायांच्या आरतीने करण्यात आली.