पुणे : पुण्याच्या आळंदीत ज्ञानेश्वर मंदिरातील प्रवेशावरून दिंडीतील वारकरी आणि पोलीसांत वाद झाल्याची घटना प्रस्थानदिनी घडली आहे. यावेळी वारकऱ्यांवर पोलीसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे इथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावरून अनेकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मोजक्याच लोकांना मंदिरात प्रवेश दिल्याने हा वाद झाला.
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी आळंदीत जमले आहेत. आज रविवारी माऊलींच्या पालखीचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच आषाढी वारी सोहळ्याला गालबोट लागलं. मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलीस आमने-सामने आले. वारकऱ्यांनी पोलिसांना न जुमानता मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्नात होते. तेव्हा पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली. यामुळं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. इंद्रायणी घाट, सिध्दबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवाडी आदी ठिकाणी भाविकांची गर्दी झाली आहे... माऊली माऊलींच्या गर्जनेने आळंदीचा परिसर दुमदुूमुन गेलेला दिसत आहे.