श्रीसंत तुकाराम गाथेच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन

0

पंढरपूर (प्रतिनिधी)  - वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथेला अनन्यसाधारण महत्व असून यामधील अफाट तत्वज्ञान पाश्‍चात देशाला देखील कळावे या उद्दात्त हेतूने डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी गाथेच्या पहिल्या खंडाचा इंग्रजीमध्ये अर्थासहीत अनुवाद केला आहे. प्रथमच गाथेचा इंग्रजीमध्ये अनुवाद होत असून याचा प्रकाशन सोहळा शुक्रवार ३० रोजी देहुकर वाडा येथे श्रीसंत तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब महाराज देहुकर यांच्या हस्ते व संतवीर बंडातात्या महाराज कराडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 
डॉ.रामकृष्ण लहवितकर हे पुणे विद्यापीठाच्या जद्गुरू तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे माजी प्रमुख होते. तसेच त्यांना महाराष्ट्र सरकारचा "ज्ञानोबा तुकोबा" हा मानाचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

संत तुकाराम गाथेमधील अभंगामध्ये विठ्ठल भक्तीचा महिमा आहेच. मात्र जीवन जगण्याविषयीचे मोठे तत्वज्ञान, जगाकडे तटस्थपणे पाहण्याचा दृष्टीकोण, कर्मवाद, जीवन जगण्याचा संदेश असे अनेक पैलू आहेत. यामुळे संत म्हणून महाराज श्रेष्ठ आहेत त्यापेक्षा एक तत्वज्ञानी, मार्गदर्शक म्हणून सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्या या गाथेचा महिमा केवळ महाराष्ट्र किंवा देशापुरता सिमीत न राहता साता समुद्रापार पोहचावा असा डॉ.लहवितकर यांचा मानस आहे. यामुळेच त्यांनी गाथेमधील पहिल्या सहाशेहून अधिक अभंगाचा इंग्रजीत अनुवाद तसेच त्याचा सविस्तर अर्थ तयार केला आहे. यासाठी इंग्रजी अनुवादक म्हणून प्रा.डॉ.विजयकुमार पाटील यांनी शिवधनुष्य पेलले.

मराठी आपली मायबोली असली तरी आजच्या पिढीचा इंग्रजीकडे अधिक ओढा आहे. किंबहुना अनेक मराठी दाम्पत्य आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेमध्ये घालण्याचा हट्ट करतात. अशा इंग्रजी शिक्षण घेणार्‍या मराठी विद्यार्थ्यांना संत तुकाराम गाथेमधील अभंगाची ओळख व्हावी म्हणून देखील अभंगाचे इंग्रजीत अनुवादन केले असल्याचे डॉ.लहवितकर यांनी सांगितले. यामुळे अभ्यासक व उपासक एकत्र यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)