भक्तांच्या भेटीला
पंढरपूर (प्रतिनिधी) --
श्रीसंत सावता माळी यांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असणार्या माढा तालुक्यातील अरण गावाची आख्यायिका आहे. कामातच देव मानणार्या "कांदा, मुळा भाजी आवघी विठाई माझी" अशी ओळख असणार्या संत सावता माळी यांच्या भेटीसाठी श्रीपांडुरंगाच्या पालखीचे प्रस्थान आज गुरूवार दि.१३ जुलै रोजी झाले.
आषाढी एकादशीच्या अगोदर संताच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान होतात. परंतु अपवाद फक्त संत शिरोमणी सावता माळी यांची पालखी येत नाही तर आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाच्या पालखी अरण येथे श्रीसंत सावता माळी यांच्या भेटीला जाते हे विशेष म्हणावे लागेल. आज सकाळी काशी कापडी समाजाच्या मठातूून हजारो भाविक भक्तांच्या वारकर्यांच्या उपस्थितीत फुलांनी सजविलेल्या पालखीत पादुका ठेवून अरणला जाण्यासाठी प्रस्थान ठेवण्यात आले.
विठ्ठल मंदिरातुन मानकर्यांनी पादुका डोक्यावर घेऊन, विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर पादुका पालखीत ठेवून अरण कडे प्रस्थान करण्यात आले, तीन दिवसानंतर विठ्ठलाची पालखी तिथे पोहोचते संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी सोहळयास उपस्थित राहून काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होते. जगाचा देव असणारा पांडुरंग भक्ताच्या म्हणजे संत सावता माळी यांच्या भेटीस जातो यामुळे या सोहळयास अत्यंत महत्त्व आहे.