*केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने दिनांक 25 ते 31 जुलै 2023 या कालावधीत डिजिटल इंडिया सप्ताहाचे आयोजन
सोलापूर (जिमाका) :- केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने दिनांक 25 ते 31 जुलै 2023 या कालावधीत डिजिटल इंडिया सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थ्यांनी या सप्ताहात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
डिजिटल इंडिया सप्ताहाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दिनांक 25 जुलै 2023 रोजी होणार आहे. तर पुढील सहा दिवस नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या वतीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सायबर सिक्युरिटी, ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल शासन, आयओटी आदी विषयावर राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन सेमिनार आयोजित करण्यात आलेले आहेत. या सेमिनारमध्ये संबंधित विषयाच्या तज्ञाकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालये, विशेषतः औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालये, यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी डिजिटल इंडिया सप्ताह चे सर्व कार्यक्रमाचे प्रक्षेपण संबंधित महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आहेत.
या सेमिनार मध्ये सामान्य नागरिक, विदध्यार्थी भाग घेवू शकणार आहेत. सेमिनार मध्य भाग घेण्यासाठी http://www.nic.in/diw2023-reg/ हया लिंकवर वैयक्तीक रित्या नोंदणी करावयाची आहे. नोंदणी करताना आपला मोबाइल नंबर व ईमेल चा पत्ता नोंदवून सबमिट केल्यावर, मोबाइल वर ओटीपी येवून पडताळणी होईल व त्या नंतर डिजिटल इंडिया सप्ताह च्या सूचना तुमच्या नोंदणीकृत मोबाइल वर प्राप्त होतील, अशी माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी कुलकर्णी यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाची अधिक माहिती सोलापूर जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ https://solapur.gov.in येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून केंद्र सरकारच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.