विविध विकास कामांसाठी ५७ कोटी ६८ लाख निधी मंजूर- आ समाधान आवताडे

0
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील भारत देशाची दक्षिण काशी म्हणून ख्याती असणाऱ्या पंढरपूर शहराच्या व मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विविध प्रलंबित विकास कामांसाठी चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान ५७ कोटी ६८ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

आमदार आवताडे यांनी पंढरपूर-  मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांची पूर्तता होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण यांच्याकडे या निधीसाठी पत्रव्यवहार केला होता. आमदार आवताडे यांच्या या मागणीची दखल घेऊन पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची सद्य काळात असणारी इमारत फार जुनी झाली असल्याने याठिकाणी उपविभागीय कार्यालयाच्या दोन इमारती उभारणीसाठी ६ कोटी ३७ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह याठिकाणी नवीन विश्रामगृह उभारणीसाठी आवश्यक निधी मिळण्यासाठीही आमदार आवताडे यांनी पाठपुरावा केला होता. देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी पंढरपूर हे एक अध्यात्मिक केंद्रस्थान आहे. त्यामुळे पंढरपूर येथे अनेक अतिमहत्त्वाच्या व महत्त्वाच्या व्यक्ती दर्शनासाठी येत असतात. या शासकीय विश्रामगृहामध्ये सध्या दहा कक्ष आहेत परंतु येथे येणाऱ्या व्यक्तींची संख्या पाहता सदर ठिकाणी सुसज्ज शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी २१कोटी १४लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर मतदारसंघातील विविध गावांना व निरनिराळ्या ठिकाणी जोडणारे अनेक रस्ते काळ्या मातीतून जात असल्याने या ठिकाणी वाहतुकीला व दैनंदिन रहदारीला अडथळा निर्माण होऊन अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर रस्ते सुधारित व पक्के करण्यासाठी आ आवताडे यांनी काही रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. या रस्त्यांच्या सुधारणा विकास कामांसाठी २६ कोटी ८४लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

या निधी अंतर्गत मंजूर झालेले रस्ते - मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव आंधळगाव पाटखळ नंदेश्वर भोसे हुन्नूर रेवेवाडी (खडकी ते नंदेश्वर) व (भोसे ते हुन्नूर) मध्ये सुधारणा करणे ५ कोटी, घेरडी हुन्नूर मारोळी सलगर ते प्रजिमा-८ मिळणारा रस्ता( लवंगी ते आसबेवाडी) रस्ता सुधारणा करणे १०कोटी , पंढरपूर तालुक्यातील तावशी ते चिचुंबे रस्ता सुधारणा करणे तसेच तावशी ते चिचुंबे मार्गावर व्ही आर-८६ येथे लहान पुलाचे बांधकाम करणेसाठी २ कोटी ८४ लाख, एमएसएच-८ भालेवाडी डोणज नंदुर रस्ता सुधारणा करणे ९कोटी.

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि धोरणात्मक प्रगतीसाठी आपल्या नेतृत्व साधनेच्या माध्यमातून नेहमीच आग्रही असणारे लोकप्रतिनिधी म्हणून आ समाधान आवताडे यांची मतदारसंघामध्ये विविध विकासकामांच्या माध्यमातून प्रतिमा उंचावत असल्याचे चित्र आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या रस्ते, वीज पाणी, शिक्षण, आरोग्य आदी सेवाक्षेत्रांच्या कार्यपूर्ततेसाठी आ आवताडे हे नेहमीच भरघोस निधीच्या रूपाने प्रयत्नशील असतात - तानाजी काकडे (माजी मिस्टर सभापती पं.स. मंगळवेढा).

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)