श्रीक्षेत्र पंढरपूर (प्रतिनिधी) - अधिक महिन्यानिमित्त पंढरपूर शहरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. गर्दीचा केंद्रबिंदू असलेल्या नामदेव पायरी - महाद्वार चौक ते महाद्वार घाट या दरम्यान किरकोळ विक्रेते आणि पथारीवाल्यांनी अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे गर्दीच्या काळात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या फेरीवाल्यांच्या दुकानांमुळे भाविकांना या मार्गावर चालणे देखील अवघड होत आहे. तर स्थानिकांना येण्या- जाण्यासाठी सर्कसच करावी लागत आहे. श्रीनामदेव पायरी समोर सेल्फी पॉइंटच झाल्याचे दिसत आहे.
या सेल्फी पॉईंट, फेरीवाले व्यापारी, गंधवाले, भिकारी, थांबलेले भाविक यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. तेथेच शेजारी मंदिर समितीच्या वतीने ॲम्बुलन्स देखील उभारलेली असते. ॲम्बुलन्स काढण्यासाठी बराच वेळ जातो.
अधिक महिन्यानिमित्त दररोज एक लाखाहून अधिक भाविक पंढरीत येत आहेत. चंद्रभागा नदीत स्नान आणि मग श्रीविठ्ठल दर्शन, असा या भाविकांचा प्राधान्यक्रम असतो. त्यातही चंद्रभागा नदीतून महाद्वार घाटमार्गे शिंदे सरकार वाडा, वारकरी ( महाद्वार ) चौक ओलंडून हे भाविक मंदिराकडे किंवा दर्शन रांगेकडे जातात. याच दरम्यान या गर्दीचा सामना त्यांना करावा लागतो, याच ठिकाणी आलेल्या वारकरी पुतळ्याजवळ रिक्षा उभ्या असतात. दोन्ही बाजूंच्या दुकानदारांची अतिक्रमणे असतात. यात भरीस भर म्हणजे महाद्वार चौक ते शिंदे सरकार वाडा या मार्गावर दोन्ही बाजूंनी पथारीवाले आणि फेरीवाले यांनी तात्पुरत्या स्वरूपाचे अतिक्रमण केलेले आहे. यामध्ये बांगड्या, इमिटेशन ज्वेलरी, पेढे, तुळशी माळा, मूर्ती, अंगठ्या, खडे विक्रेते दुकाने थाटून उभा आहेत.
पालिका प्रशासन निष्क्रिय
रहदारीच्या रस्त्यावर थाटलेली ही दुकाने काढून टाकावीत, त्यांना बसण्यासाठी अन्यत्र जागा द्यावी, अशी भाविकांची मागणी आहे. विशेष म्हणजे पंढरपूर नगरपालिका अतिक्रमणविरोधी पथक काहीच कारवाई करत नाहीत. महाद्वार चौकात थांबणारे पोलिसही बघ्याची भूमिका घेतात. या निष्क्रियतेबद्दल भाविकातून नाराजी व्यक्त होत आहे.