'हिरा फेरी’तून 'अभिनय' च्या अभिनयाची वेगळी छाप !

0
मुंबई (प्रतिनिधी) - झकास मनोरंजनाला वेगवान तडका देत 'हिरा फेरी' करण्यासाठी अभिनेता अभिनय सावंत 'अल्ट्रा झक्कास' या मराठी ओटीटीवर लवकरच येत. महाराष्ट्राची लाडकी लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा अभिनय हा सुपुत्र. त्याने केदार शिंदे दिग्दर्शित 'श्रीमंत दामोदर पंत' या चित्रपटातून आपलं दमदार पदार्पण करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर 'अकल्पित', 'थापाड्या' या चित्रपटांसोबतच ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं!’, 'नवरी मिळे नवऱ्याला' या लोकप्रिय मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनामनात आणि घराघरात पोहचला आहे. अमोल बिडकर दिग्दर्शित आणि 'अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रा. लि.'चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल निर्मित 'हिरा फेरी' या आगामी चित्रपटात अभिनयची केमिस्ट्री 'बॉईज-२' फेम अभिनेत्री शुभांगी तांबळे हिच्यासोबत जमली असून त्यासोबतच अभिनेते विजय पटवर्धन, मालवणी सम्राट दिगंबर नाईक, स्टॅंड-अप कॉमेडीस्टार प्रवीण प्रभाकर, नितीन बोधरे इत्यादी कलाकारांसोबत अभिनयची जुगलबंदी रंगणार आहे. या निमित्ताने अभिनयशी साधलेला हा खुसखुशीत संवाद त्याच्याच शब्दात.... 
१. तुझ्या आगामी “हिरा फेरी” चित्रपटाबद्दल काय सांगशील?
- “हिरा फेरी” हा फुल पैसा वसूल चित्रपट आहे. विनोद हा माझ्या प्रचंड जिव्हाळ्याचा विषय आहे. तो नसता तर काय झाले असते याची मी कल्पनाही करू शकत नाही. जेव्हा अमोल सरांनी मला यातील प्रमुख व्यक्तिरेखा आणि कथा  ऐकवली आणि या चित्रपटासाठी  जॉनर सांगितला त्या क्षणीच मी होकार दिला. मी या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे. विकी असं माझ्या व्यक्तिरेखेचे नाव असून त्याने पळून जाऊन लग्न केलंय पण तो घर जावई आहे, सासरा आणि जावई यांच्यात ‘टॉम अँड जेरी’ सारखं धम्माल रिलेशन असून हे वेगळं कॉम्बिनेशन विशेष गंमतशीर आहे. विकीला स्ट्रगल न करता स्टार व्हायचंय. सहज पैसे कसे मिळविता येतील यासाठी तो काय काय उचापती करतो याचा मजेशीर प्रवास या चित्रपटात आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात हा विनोदी चित्रपट येतोय याचा मला खूप आनंद आहे.
२. चित्रीकरणादरम्यान घडलेली एखादी अविस्मरणीय घटना...?
- एक किस्सा मला आठवतो जो आवर्जून सांगेल की, ज्यावेळी या चित्रपटाचं चित्रीकरण चालू होतं, तेव्हा एकदम कडाक्याची थंडी होती. शुभांगीसोबत रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण, आणि तेही 'स्विमिंग पूल' मध्ये चित्रित करायचं होतं... कोरियोग्राफर अनुपम हिंगे, पूजा काळे, खुशबू जाधव यांनी रग्गड सराव करून घेतला. पण ज्या दिवशी चित्रीकरण करायचं होतं त्या दिवशी रात्रीचं जवळजवळ १६ ते १७ डिग्रीच्या आसपास तापमान होतं. अश्या कडाक्याच्या  थंडीतील या वातावरणात आधीच सगळं युनिट गारठलेले होते. मात्र मला या थंडीत स्विमिंग पूलमध्ये वॉमअप करताना पाहून डि.ओ.पी मधू गावडा चकित झाले. त्यांनी लायटिंगसाठी माझी मदत घेतली, ती अख्खी रात्र मी थंडगार पाण्यात होतो. ही माझ्यासाठी फार खतरनाक आठवण आहे. 

३. सेटवर ‘हिरा फेरी’तील सहकलाकारांसोबत काही रंजक प्रसंग घडले होते का ?
- या चित्रपटामध्ये एक मांत्रिक आहे. ते नितीन बोधरे या कलाकाराने केलं आहे. त्याच्या विसरभोळ्या स्वभावामुळे अनेकवेळा धम्माल येत असे, तो सेटवर असला कि संपूर्ण सेटवर हशा पिकायचा. त्याला सेटवर आम्ही सगळे फंबलकुमार म्हणायचो.

४. थेट OTT वर या चित्रपटाचा PREMIERE होतोय, तुझी काय भावना आहे?
- आपला प्रेक्षक वाढतोय ! चित्रपटगृहात एका तिकीटाच्या दरात एकच व्यक्ति चित्रपट बघू शकतो, पण ओटीटीमुळे एका सबस्क्रिप्शनवर संपूर्ण कुटुंब चित्रपट पाहू शकतात. एवढा मोठा प्लॅटफॉर्म “अल्ट्रा झकास मराठी ओटीटी”मुळे “हिरा फेरी” चित्रपटाला मिळालाय याचा मोठा आनंद आहे. पुढील महिन्यात या चित्रपटाचा प्रीमियर होतोय मी खूप उत्सुक आहे... 

५. प्रेक्षकांनी “हिरा फेरी” चित्रपट का बघावा, काय सांगशील?
- जगातलं सगळं टेंशन विसरून खूप हसायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने “हिरा फेरी” पहावा. आज प्रत्येक माणूस आपापल्या व्यापात - टेंशनमध्ये असतो, पण हा चित्रपट जेव्हा प्रेक्षक बघतील, तेव्हा नक्कीच त्यांच्या आयुष्यातलं हे टेंशन कमी होणार आहे, याची मला खात्री आहे. “हिरा फेरी” हे एक फुल्ल टू पैसा वसूल मनोरंजन आहे. 
    
६. अभिनयासोबतच विनोदाचं बाळकडू उपजत असल्याने, तुझ्याकडून प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा आहेत, काय सांगशील?
- नक्कीच! विनोदाचे माझ्यावर गर्भ संस्कार झाले आहेत. मात्र आईकडून मी अजूनही शिकतोय, ती अख्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे आणि मी तिचा मुलगा असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप असतात, पण मी त्यांचं कुठलही ओझं न घेता, माझ्यातला अभिनेता नैसर्गिक अभिनय करण्याचा कायम प्रयत्न करीत असतो. पाहूया पल्ला खूप मोठा आहे. नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे असं मी समजतो.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)