काँग्रेसच्या माथाडी विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कामगारांच्या समस्या प्रश्नी आंदोलनाचा पावित्रा : शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचीही मागणी
पंढरपूर (प्रतिनिधी) - सोलापूर जिल्हा हा पूर्वीपासूनच कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. अशा या जिल्ह्यामध्ये लाखो कामगार आपली उपजीविका जेमतेम पद्धतीने करीत आहेत. तर 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या कामगारांवर बिकट परिस्थिती ओढावली असल्याने या कामगारांना पेन्शन अथवा आर्थिक मदत सुरू करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अशोकराव पाटोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माथाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा माथाडी विभाग कामगारांच्या विविध प्रश्नासाठी आक्रमक झाला असून जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन दरबारी ठोसपणे पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रसंगी यासाठी जिल्ह्यातील कामगारांना बरोबर घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा पावित्त्राही दाखविण्यात येत आहे.
काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील माथाडी, ऊसतोड, वीटभट्टी यांच्यासह आपल्या उपजीविकेसाठी कष्ट प्राय मेहनत करीत असलेल्या 60 पेक्षा जास्त वय असलेल्या कामगारांना पेन्शन अथवा आर्थिक मदत देण्यात यावी. कारण या कामगारांना आपल्या वाढत्या वयामुळे काम करता येत नाही. त्यामुळे त्यांची ससेहोलपट होत आहे. या कामगारांसाठी ही पेन्शन लवकरच लागू न झाल्यास कामगारांसमवेत आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली असून यामुळे शेतीमध्ये असणारी उभी पिके जळून चालली आहेत. तर शेतकऱ्यांना गत हंगामातील पीक विमाही मिळालेला नाही. यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई तत्परतेने मिळावी. अशी मागणी ही या निवेदनाद्वारे काँग्रेसच्या माथाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटोळे यांनी केली आहे.
पंढरीत अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवा...
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी दररोज हजारो भाविक येत असतात. या भाविकांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती व्हावी. यासाठी पंढरपूर शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून जागा आरक्षित करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात यावा. कारण शहरांमध्ये सर्व महापुरुषांचे पुतळे असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अद्यापही बसवण्यात आला नाही. ही खेदाची बाब आहे. त्यामुळे शहरांमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावा अशी ही मागणी निवेदनाद्वारे काँग्रेसच्या माथाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे यांनी केली आहे.