अधिक मासातील एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज - प्रांताधिकारी

0
पंढरपूर (दि.26) :- अधिक श्रावण मासातील कमला एकादशी दिनांक 29 जुलै रोजी असून दिनांक 28 ते 30 जुलै 2023 या कालावधीत पंढरपुरात श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या  व   स्थानिक नागरिकांच्या  आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.  
अधिक मासानिमित्त येणाऱ्या भाविकांना प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या  सोयी सुविधाबाबत प्रांताधिकारी कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूंजकर, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
 यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे  सुलभ व  जलद दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीमार्फत योग्य नियोजन केले असून,   दर्शन रांग, दर्शन मंडप येथे  स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालय आदीबाबत व्यवस्था उपलब्ध राहिल याची दक्षता घेण्यात आली आहे. नगरपालिकेने शहरात तसेच प्रदक्षिणा मार्ग व मंदीर परिसर येथील स्वच्छता व शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. पोलीस प्रशासनाने शहरात तसेच मंदीर परिसरात वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेवून आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली असून,च अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ, प्रसादाची दुकाने यांच्या  वेळोवेळी तपासण्या करण्यात येणार असल्याचे  प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.
 अधिक मासा निमित्त पंढरपूरात येणाऱ्या वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी  तसेच शहरात व मंदीर परिसरात वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेवून  सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी आवश्यक नियोजन केले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांनी सांगितले.
अधिक मासानिमित्त पंढरपुरात श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने  भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या दृष्टीने स्वच्छतेला प्राधान्य दिले असून नगरपालिकेकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. तसेच वाहनतळावर आवश्यक ठिकाणी मुरमीकरण व प्रकाश व्यवस्था करण्यात येत आहे. वाळवंट, मंदिर व मंदिर परिसरातील अतिक्रमणे  तात्काळ  काढण्यात येणार असून यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने पथके तयार करण्यात आली आहेत. पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था मोफत असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.
अधिक मासानिमित्त मंदीर समितीकडून भाविकांसाठी सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच पत्राशेड,दर्शनरांग, दर्शन मंडप येथे स्वच्छता, मॅटची व्यवस्था, बसण्याची सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन सुविधा उपलब्ध  करण्यात आली आहे. मंदिर परिसरामध्ये दोन अद्ययावत रूग्णवाहिका वैद्यकीय पथकासह ठेवण्यात आलेल्या  आहेत.दर्शनमंडप येथे अद्ययावत प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. चंद्रभागा वाळवंट येथे महिला भाविकांच्या सोईसाठी चेंजिंग रूम व दर्शनरांगेत हिरकणी, विश्रांती कक्ष उभारण्यात आले आहेत. अधिकमास कालावधीतील शुध्द दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी दर्शनरांगेतील भाविकांना मोफत चहा व खिचडी वाटप करण्यात येणार असल्याचे मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)