प्रदुषण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार होणार कारवाई
सोलापूर (प्रतिनिधी) -- केंद्रीय प्रदुषण मंडळाने पीओपी मुर्तीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आगामी कालावधीत येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सोलापूर शहरातील मुर्ती उत्पादक, कारागीर व कामगारांनी पीओपीच्या मुर्ती तयार करु नयेत. जर कोणी केल्या तर त्यांच्यावर प्रदुषण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारवाई करण्यात येईल असे सोलापूरमहापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या जाहिर प्रसिद्धीकरणात म्हटले आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीगणेशाच्या मोठमोठाल्या मुर्त्या यासाठी बनवल्या जातात. शहरात गणेश मुर्त्या तयार करणाऱ्या कारखान्यादार व कारागीराची संख्याही मोठी आहे. सोलापूरातून परराज्यातही मोठ्या प्रमाणावर गणेशमुर्त्या पाठवल्या जातात. केंद्रीय प्रदुषण मंडळाने यंदाही पीओपी मुर्त्यावर बंदी घातली असून याबाबत आदेश निर्गमीत केला आहे. तरी शहरातील मुर्ती उत्पादक व कारागीरांनी पीओपीच्या मुर्त्या तयार करु नयेत असे आवाहन महापालिकेने केले आहे.
'इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा'
पीओपी चे विघटन लवकर न होत असल्यामुळे यावर्षीपासून सर्वांनी इकोफ्रेंडली गणेश मूर्ती आणून पर्यावरणाचे संरक्षण करावे. शाडू माती, मुंबई माती, गोपीचंदन, लाल माती, कागद व शेणापासून बनवलेल्या मूर्तीचा वापर करून पर्यावरण पूरक गणेशोत्सवास सर्वांनी प्राधान्य द्यावे.
निसर्गावर कोणताही ओरखडा न येऊ देता गणेश मूर्तीपासून सजावट ते थेट विसर्जनापर्यंत हा उत्सव साजरा करण्याकडे लोक जागृती अभियान चालविले पाहिजे; पर्यावरण पूरक मूर्ती आणून निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. यासाठी सामाजिक संस्था, संघटना आदींनी प्रयत्नशील राहिले पाहिजे.