उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना राज्य शासनाकडून पुरस्कार

0


        *स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 5 सप्टेंबर 2023 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावेत

 

      सोलापूर, दि. 27 ( जिमाका) :-  राज्यात दिनांक 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या मेलवर दि. 5 सप्टेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

     या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी कार्यपध्दत पुढीलप्रमाणे राहिल :-

              या शासन स्पर्धेत, धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड पुढील निकषांच्या आधारे करण्यात येईल. यासाठी आवश्यक गुणांकनाची बाब व गुण पुढील प्रमाणे राहतील.

1.पर्यावरणपुरक मूर्ती(10 गुण)

2. पर्यावरणपुरक सजावट (थर्माकोल/प्लॅस्टीक विरहीत)- 15 गुण.

3. ध्वनीप्रदुषण रहित वातावरण-5 गुण

4.पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, इ. समाज प्रबोधन 1 सामाजिक सलोखा संदर्भात सजावट / देखावा -20 गुण तसेच स्वांतत्र्याच्या चळवळीसंदर्भात / छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट / देखावा-  25 गुण.

5.गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबीर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर उर्जाबद्दल | जागरुकता निर्माण करणे, अॅम्बुलन्स चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे इ. सामाजिक कार्य (अनु. क्र. 6 व 7 व्यतिरिक्त)- 20 गुण

6 .शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी/ विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, इत्यादीबाबत केलेले कार्य महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक/ आरोग्य / सामाजिक इत्यादीबाबत केलेले कार्य- 15गुण

7. पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम/स्पर्धा- 10 गुण

8.पारंपारिक/ देशी खेळांच्या स्पर्धा- 10 गुण

9. महिला ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक आरोग्य सामाजिक इत्यादी बाबत केलेले कार्य- 15 गुण

10.गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी/ प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता (प्रत्येक सुविधेस 5 गुण) एकूण- 25. असे या स्पर्धेसाठी एकूण एक ते दहा बाबीसाठी एकूण 150 गुण ठेवण्यात आलेले आहेत.

            या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळ यांना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार असून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे. वरील बाबींची पुर्तता करणाऱ्या / करु शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. 4 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "अ" येथे आहे.

              सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर दि. 5 सप्टेंबर 2023 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावेत. प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांनी प्राप्त झालेले जिल्हा निहाय अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास दि. 8 सप्टेंबर 2023 पूर्वी उपलब्ध करुन द्यावेत. याकरीता प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र इमेल आयडी तयार करुन सदर इमेल आयडी प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांना त्यांच्या वरील इमेलवर दि. 15 ऑगस्ट 2023 पूर्वी कळवावे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)