अयोध्येत बनणार देशातील सर्वांत सुंदर रेल्वे स्थानक

0
मंदिराच्या शैलीतच असेल अयोध्येचे रेल्वे स्टेशन

अयोध्या (वृत्तसंस्था) - अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. राम मंदिर ट्रस्टने पुढील वर्षी या मंदिराचे उद्घाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मंदिर बांधल्यानंतर येथे दरवर्षी लाखो लोक येण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारपासून ते उत्तर प्रदेश सरकार अयोध्येला जोडणाऱ्या वाहतुकीच्या सर्व साधनांमध्ये सुधारणा करण्यात गुंतले आहे. शहरात भव्य विमानतळ आणि रेल्वे स्थानक उभारण्यात येत आहे. अयोध्येच्या रेल्वे स्थानकाची नूतनीकरण सुरु असलेली वास्तू श्रीरामजन्मभूमी मंदिरापासून प्रेरित आहे.

अयोध्येतील रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण केले जात आहे. अयोध्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाबाबत रेल्वे मंत्रालयाने एक प्रमुख अपडेट शेअर केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे या नवीन जंक्शनची वास्तुकला श्रीरामजन्मभूमी मंदिरापासून प्रेरित आहे. हे स्टेशन २ रेल्वे मार्गावर (वाराणसी-जौनपूर-अयोध्या- लखनौ लाईन आणि गोरखपूर मानकापूर-अयोध्या लाईन) वर स्थित आहे. सध्या अयोध्या रेल्वे स्थानकात ३ प्लॅटफॉर्म आणि ५ रेल्वे ट्रॅक आहेत.

ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, भारतीय रेल्वे देशभरातील १२७५ रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करत आहे. यामध्ये अयोध्येसह उत्तर प्रदेशातील १४९ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीमुळे प्रवाशांची वाढती संख्या हाताळण्यासाठी या स्टेशनची क्षमता वाढवण्यात येणार आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते अयोध्या हे आधुनिक सुविधांसह देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक बनणार आहे. स्टेशनची इमारत सुमारे दहा हजार चौरस मीटरमध्ये विकसित केली जात आहे. अयोध्येच्या रेल्वे स्थानकावर विमानतळासारखी सुविधा देण्याचे काम जोरात सुरू आहे. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)